गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
schedule02 Jul 25 person by visibility 287 categoryराज्य

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची ३.०६ एकर जागा आहे. त्यापैकी ०.७५ हे.आर. जागा पशुसंवर्धन विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन व दुग्धविकास उपायुक्त या कार्यालयासाठी स्वतंत्र मजला प्रस्तावित बांधकामांमध्ये समाविष्ट करावा, उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडे ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील त्यांच्या समिती कक्षात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीचे पार पडली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार आशुतोष काळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामास्वामी ए., पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हे उपविभागीय कार्यालय असलेले शहर आहे. या ठिकाणी प्रांत कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, सहकार, कृषी इत्यादी कार्यालय आहेत आणि ती सर्व भाड्याच्या जागेत आहेत. आता पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व महत्त्वाच्या विभागांच्या कार्यालयासाठी एकत्र प्रशासकीय इमारत बांधणे शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.