घरगुती गार्डन वेस्ट संकलनासाठी कोल्हापूर महापालिकेची विशेष मोहीम
schedule16 Jul 25 person by visibility 199 categoryमहानगरपालिका

▪️नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन
कोल्हापूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आता घरगुती गार्डन वेस्ट म्हणजेच झाडांची फांद्या, पालापाचोळा, झाडांचे कटींग आदी जैविक कचऱ्यासाठी विशेष संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सध्या या प्रकारचा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे नागरिक तो सार्वजनिक ठिकाणी टाकत आहेत. यामुळे रस्त्यावर नव्याने कचऱ्याचे ढीग तयार होत असून, महापालिकेला तो स्वतंत्रपणे उचलावा लागत आहे. याच वेस्टेजमध्ये इतर प्लॅस्टिक किंवा ओला कचरा मिसळल्याने प्रक्रिया करणेही अडचणीचे होत आहे. त्यामुळे महापालिकेने घरपोच कचरा संकलन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील गार्डन वेस्टसाठी फक्त व्हॉट्सअॅपवर तक्रार नोंदवावी लागेल. याचा तक्रार नोंदविण्याचा नंबर : 9766532037 (हा नंबर फक्त व्हॉट्सअॅपसाठी असून यावर कॉल स्वीकारले जाणार नाहीत).
तक्रार पाठविताना नागरीकांनी व्हॉट्सअॅपवर संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर नोंदवून सदरची तक्रार करावी लागणार आहे. तक्रार नोंदविल्यानंतर महापालिकेकडून ट्रॅक्टर कोणत्या वेळेत येणार हे कळविले जाईल. ती वेळ सोयीची नसल्यास, पर्यायी वेळ नागरीकाने कळवावी. गार्डन वेस्ट म्हणजेच झाडांची फांद्या, पालापाचोळा, झाडांचे कटींग भरताना नागरिकांनी स्वतः किंवा घरातील इतर व्यक्ती उपस्थित ठेवावा लागेल. महापालिकेकडून नागरीकांना प्रत्येक ठिकाणी कचरा भरायला 20 मिनिटांची वेळ दिली जाईल. या वेळेव्यतिरिक्त गाडी जादा वेळ थांबणार नाही. त्यामुळे कचरा तयार झाल्यानंतरच नागरीकांनी तक्रार व्हॉट्सअॅपवर करावी. महापालिकेकडून ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे वेळेत कचरा संकलन, योग्य प्रक्रिया व शहराची स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेस सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.