नवोदितांनी आव्हानांना संधीत बदलावे : सुनील कुलकर्णी; केआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहात
schedule15 Sep 26 person by visibility 151 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: " विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या आव्हानांकडे एक संधी म्हणून पाहावे. सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते," असे प्रतिपादन केआयटी आयएमईआरचे विश्वस्त संचालक सुनील कुलकर्णी यांनी केले.
केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त), कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंडक्शन प्रोग्राम’च्या उद्घाटन सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कॉलेजच्या सेंट्रल सेमिनार हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. क्षितिजा ताशी यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. कुरेशी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सर्व नवोदित विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे स्वागत केले.
या प्रसंगी केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते मुख्य अतिथी सुनील कुलकर्णी यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या समृद्ध परंपरेची माहिती दिली. ते म्हणाले, "केआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशाळा आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा."
या इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने करिअर आणि तांत्रिक शिक्षणातील आवश्यक कौशल्ये, परीक्षा व मूल्यमापन पद्धती, महाविद्यालयातील विविध स्टुडंट क्लब्स, तसेच नवोदित उमेदवारांकडून उद्योग क्षेत्राच्या असणाऱ्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.
यासोबतच गोंधळाकडून स्पष्टतेकडे नेणारा 'गुरू' मेंटरिंग प्रवास, स्टार्टअप इको-सिस्टम, संवाद कौशल्य: यशाचा राजमार्ग, प्रोजेक्ट-बेस्ड लर्निंग आणि शैक्षणिक प्रकल्प, एनसीसी व शौर्य उपक्रम, परदेशी भाषांचे महत्त्व, आर्थिक साक्षरता, शिष्यवृत्ती योजनांविषयी जनजागृती, व्यावसायिकता आणि यश, पदवीच्या पलीकडे उपलब्ध असणाऱ्या प्लेसमेंट, उच्च शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी, सर्जनशील कला, पर्यावरण जागृती, स्वतःचा व इतरांचा आदर करण्याची वृत्ती आणि तणावमुक्त जीवनासाठी 'आर्ट ऑफ लिविंग' या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती इंडक्शन प्रोग्रामच्या समन्वयक प्रा. मिनाज शिकलगार यांनी दिली.
या कार्यक्रमात प्रसंगी अधिष्ठाता,विद्यार्थी उपक्रम विभाग डॉ. जितेंद्र भाट उपस्थित होते.या इंडक्शन प्रोग्राम साठी संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचा समारोप प्रा.मिनाज शिकलगार यांनी मानलेल्या आभारप्रदर्शनाने झाला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यामुळे महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली