SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन: काळाची गरजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणीनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा : भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव १ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईयंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर; विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

जाहिरात

 

अन्न व औषध प्रशासनाचा बनावट अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणारा जेरबंद!

schedule03 Sep 26 person by visibility 173 categoryगुन्हे

◼️५० ते ६० हॉटेल मालकांना लुटणारा भामटा स्थानिक गुन्हे अन्वेषण शािळेच्या जाळ्यात; चोरीच्या दुचाकीसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) अधिकारी भासवून हॉटेल व्यावसायिकांना खोट्या कारवाईची भीती घालायची आणि खंडणी उकळायची, अशा गोरखधंद्यात सक्रिय असणाऱ्या एका चलाख भामट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. महादेव नामदेव लोहार (वय ३५, रा. सुतारगल्ली, गोगवे, ता. शाहूवाडी) असे या जेरबंद केलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून, तो आणि त्याचा साथीदार मिळून तब्बल ५० ते ६० हॉटेल मालकांना गंडवल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील धनाजी मारुती पाटील यांचे स्वतःचे 'विराज नाष्टा सेंटर' नावाचे हॉटेल आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना यादव व लोहार नावाच्या व्यक्तींनी फोन करून आपण अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगितले. हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून ती टाळण्यासाठी त्यांनी १० हजार रुपयांच्या रोख रकमेची मागणी केली. मात्र, हॉटेल मालक धनाजी पाटील यांना या फोन कॉलबाबत संशय आल्याने त्यांनी तात्काळ न घाबरता कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधत याची माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक  अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पथकाने सापळा रचण्याचे ठरवले. लोहार याने तक्रारदार यांना पैसे घेऊन लक्ष्मीपुरी येथील परमाळे सायकल दुकान परिसरात बोलावले होते. त्यानुसार पोलिसांनी तिथे आधीच सापळा रचला होता.  तक्रारदार धनाजी पाटील यांनी लोहार याला पैसे दिले, तशीच पोलिसांनी झडप घालून त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले.

आरोपी महादेव लोहार याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच १० डीए ४७८७) आणि हडपलेली रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे जप्त केलेल्या या मोटारसायकलची कसून चौकशी केली असता, ती शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे उघडकीस आले असून, त्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, तो आणि त्याचा साथीदार प्रशांत सर्जेराव यादव (रा. पिशवी रोड, बांबवडे, ता. शाहूवाडी) हे दोघेजण मिळून ग्रामीण भागातील हॉटेलची पाहणी करून बोर्डवरील नंबर मिळवायचे. त्यानंतर हॉटेल मालकांना बोगस कारवाईची भीती दाखवून खंडणी उकळत असत. या दोघांनी मिळून आतापर्यंत अंदाजे ५० ते ६० हून अधिक हॉटेल मालकांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपीला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याचा दुसरा पसार साथीदार प्रशांत यादव याचा कसून शोध घेतला जात आहे.

सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, अमित मर्दाने, सुशांत तळप, सचिन जाधव, वसंत पिंगळे, संदीप पाटील, विनायक चौगुले आणि सचिन पाटील यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes