कोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन
schedule04 Sep 26 person by visibility 113 categoryसामाजिक
* खा.संजय राऊत, साहित्यीक उदय प्रकाश यांच्यासह मान्यवर साहित्यीक, कलाकारांची उपस्थिती
कोल्हापूर : महाराष्ट्र दिनमान च्या वतीने शुक्रवारी ४ सप्टेंबर आणि शनिवारी ५ सप्टेंबर रोजी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील दिग्गज साहित्यीक, कलाकारांशी हितगुज करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यीक उदय प्रकाश, खासदार संजय राऊत, चिन्मयी सुमीत, प्रज्ञा दया पवार, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साहित्य, कला, नाट्य अशा भरगच्च दोन दिवसांचे कार्यक्रम दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेच्या अभिजात उत्सव रसिकांना विनामुल्य ठेवण्यात आला आहे.
राजर्षी शाहू स्मारकाच्या मुख्य सभागृहात शुक्रवारी (दि.४) सकाळी दहा वाजता ज्येष्ठ साहित्यीक उदय प्रकाश आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनमान साहित्य उत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
सकाळी साडेअकरा वाजता मराठी कवी आणि लेखिका प्रज्ञा दया पवार यांची मुलाखत होणार आहे. ज्येष्ठ साहित्यीक एकनाथ पाटील आणि नंदकुमार मोरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकावर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक डॉ. विजय चोरमारे आणि पत्रकार अमेय तिरोडकर राऊत यांची मुलाखत घेणार आहेत. विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चित्रपट, नाट्य आणि मालिकेतील अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्याशी संवाद होणार आहे. दुपारी सव्वा एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात चिन्मयी सुमीत यांची मुलाखत हिमांशु स्मार्त घेणार आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहिय सभेच्यावतीने चिन्मयी सुमीत यांना कोयनामाई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दुपारच्या भोजनानंतर तीन समकालीन लेखकांची चर्चा होणार आहे. यामध्ये आसाराम लोमटे, कृष्णात खोत आणि नामदेव माळी हे लेखक सहभागी होणार आहे. सायंकाळच्या सत्रात सवाल जवाब (अभिव्यक्तीचा तमाशा) या नाटकांची पर्वणी रसिकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
पाच सप्टेंबर रोजीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता पुस्तकाच्या अंतरगात या कार्यक्रमात लेखक विनायक होगाडे, सोनाली नवांगुळ, भरत दौंडकर या लेखकांशी आलोक जत्राटकर आणि विनोद कांबळे संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता उत्सवाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ हिंदी साहित्यीक उदय प्रकाश यांची मुलाखत होणार आहे. गणेश विसपुते त्यांची मुलाखत घेणार आहेत.
दुपारी बारा वाजता व्यंगचित्रकारांची मैफल होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर व्यंगचित्रकार मंजूल, आलोक आणि गौरव सर्जेराव यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी एक वाजता ‘जागतिक रणांगणात महाराणी ताराबाई’ या विषयावर मेधा देशमुख भास्करन यांच्याशी डॉ. प्रमिला जरग आणि डॉ. मंजुश्री पवार संवाद साधणार आहेत. यावेळी खासदार शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
दुपारी तीन वाजता चित्र, शिल्प काव्य मैफल होणार आहे. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे भरत दौंडकर, नितीन चंदनशिवे, अविनाश काठवटे, रफीक सुरज, भीमराव धुळुबुळू, चंद्रकांत पोतदार, स्वाती शिंदे-पवार, विलास माळी, इंद्रजीत घुले, आबा पाटील हे मान्यवर कवी सहभागी होणार आहे.