सहकाराचा इतिहास 'दत्ताजीराव कदमां'शिवाय अपूर्ण; शरद पवारांकडून कार्याचा गौरव
schedule07 Jun 26 person by visibility 243 categoryराज्य
◼️शिरदवाड येथे खासदार दत्ताजीराव कदम सोसायटीचा शतकपूर्ती महोत्सव संपन्न
शिरदवाड : कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचा इतिहास दत्ताजीराव कदम यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 1926 मध्ये स्थापन झालेल्या सोसायटीने शंभर वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांना बळ देण्याचे कार्य केले असून, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशात वेगळी ओळख मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. सहकारी संस्था, बँका आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला विकासाचा आदर्श दिला आहे. दत्ताजीराव कदम यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहिले. त्यांच्या कार्यामुळे हजारो शेतकरी आणि सर्वसामान्यांना विकासाची नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
खासदार दत्ताजीराव कदम (आण्णा) शिरदवाड विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवात शरदचंद्र पवार बोलत होते.
प्रारंभी कोनशीलेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सोसायटीच्या खत गोडावून व नविन गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या शतकपूर्तीच्या गौरवअंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात या भागात अनेकांनी काम केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता राज्याला लाभाला. वसंतदादा पाटील, दत्ताजीराव कदम, रत्नापाण्णा कुंभार, शामराव पाटील यड्रावकर, बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, आबासाहेब कुलकर्णी, कलाप्पाण्णा आवाडे असतील यांनी या क्षेत्राला जबरदस्त शक्ती देण्याचं काम केलं.
आज सहकारी सोसायट्यांपासून राज्य बँकेपर्यंत अनेक संस्था आपल्याकडे आहेत. आनंद या गोष्टींचा होतो, या सगळ्या संस्थांना चांगल्या विचारांच्या माळेमध्ये गुंफण्यांचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक देशाची मोठी बँक आहे. ही कारखानदारी आहे, त्या कारखानदारीनं निव्वळ महाराष्ट्र नाही, तर सगळ्या देशामध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार असेल या सगळ्या भागात कारखानदारी सरकारच्या माध्यमातून उभी करुन त्याला ताकद आणि योग्य विचार द्यायचं काम या भागातील नेतृत्त्वानं केलं हे आपण विसरु शकत नाही,
महाराष्ट्रातील साखर कारखानदारीने देशाला चांगला विचार देण्याचं काम केलं आहे.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये दत्ताजीराव कदम यांचे नाव घेतलं नाही तर ती यादी कधीच पूर्ण होणार नाही. दत्ताजीराव कदम गेले त्या दिवशी या जिल्ह्यातच होतो. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून त्यांना खांदा द्यायला आलो होतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, येथील महोत्सवी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती ही परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. डॉक्टरांचा सल्ला असूनही पवार साहेब लोकांच्या आग्रहाखातर कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेचा गौरव वाढविला. त्यांनी सहकार क्षेत्रातील दिवंगत कदम अण्णांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या प्रेरणेतून अनेक सहकारी संस्था आजही यशस्वीपणे कार्यरत असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि युवकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम विकास सेवा सोसायट्यांमार्फत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा, खत व स्वस्त धान्य यांसारख्या सेवा देत संस्था सर्वसामान्यांना आधार देत असल्याचे नमूद करून शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात दिवंगत कदम अण्णांच्या दूरदृष्टीचा गौरव करताना सांगितले की, शंभर वर्षांपूर्वी त्यांनी केवळ एक सहकारी संस्था उभी केली नाही, तर संपूर्ण परिसराच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नातूनच विकास सेवा सोसायटीसह अनेक सहकारी उपक्रमांची उभारणी झाली. शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पतपुरवठा, खत विक्री, पाणीपुरवठा योजना, कारखानदारी आणि विविध विकासकामांचे जाळे त्यांनी उभे केले. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली.
पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकार चळवळ देशात आणि जगात ओळख निर्माण करू शकली, त्यामागे शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वाचे मोठे योगदान आहे. बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, गृहनिर्माण संस्था अशा विविध माध्यमांतून सहकाराची ताकद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. विकास म्हणजे केवळ रस्ते किंवा इमारती नव्हेत, तर सामान्य माणसाच्या उत्पन्नात वाढ होणे हा खरा विकास असल्याचे त्यांनी नमूद केले.
कदम अण्णांनी रुजविलेल्या सहकाराच्या विचारातून अनेक संस्था आणि नेतृत्व घडले. आज त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत असून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती मनिषा कदम, माजी आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांची मनोगते झाली.
कार्यक्रमास माजी खासदार कलापाण्णा आवाडे, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोकराव माने, गणपतराव पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर , जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, सभापती मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे, प्रचिता कोळी, प्रशांत शहापुरे, अर्चना चौगुले, माजी आमदार राजीव आवळे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, सरपंच सुजाता कोळी, अमरसिंह पाटील, धनाजीराव जगदाळे, रावसाहेब भिलवडे, संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, व्हा. चेअरमन विशाल खोत, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रणजीत कदम यांनी मानले.