कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई; ४३२ चालकांकडून ३,८०,८५० रुपयांचा दंड वसूल
schedule20 Aug 26 person by visibility 156 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या कालावधीत शहरातील महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, सायबर चौक आणि खरी कॉर्नर या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली. अल्पवयीन वाहन चालविणारे, ट्रिपल सीट वाहने चालवून हुल्लडबाजी करणारे, वाहनांचे सायलेन्सर बदलून व कर्णकर्कश हॉर्न वाजवून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर ही धडक कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे एकूण ४३२ वाहनचालक आढळले, ज्यांच्याकडून ३,८०,८५०/- रुपये इतका दंड आकारण्यात आला. यामध्ये अल्पवयीन वाहन चालविणारे ११ चालक व पालक यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ५५,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. ठिकाणे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह शहर वाहतूक शाखा व विविध पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.