"मुस्लिम ओबीसी आरक्षणाचे जनक हाजी शब्बीर अन्सारी यांना कोल्हापुरात भावपूर्ण श्रद्धांजली"
schedule28 Mar 26 person by visibility 170 categoryसामाजिक
कोल्हापूर : ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुस्लिम समाजातील उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे झुंजार नेतृत्व हाजी शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाबद्दल कोल्हापुरात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये पार पडलेल्या या सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शब्बीर भाईंच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर होते.
अध्यक्षीय भाषणात गणी आजरेकर यांनी शब्बीर भाईंच्या संघर्षाला उजाळा दिला. "शब्बीर भाई म्हणजे अखंड भ्रमंती! महाराष्ट्रातील असे एकही खेडे नसेल जिथे ते पोहोचले नाहीत. त्यांनी मुस्लिम समाजातील ६० ते ७० पेक्षा जास्त पोटजाती शोधून काढल्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले. १९९४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून मंडल आयोग लागू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता," असे गौरवद्गार आजरेकर यांनी काढले.
मुस्लिम ओबीसी चळवळीचा पाया रचणारे रफीक शेख यांनी यावेळी सांगितले की, १९८३ मध्ये जालन्यातून सुरू झालेली ही संघटना पुढे १९९५ मध्ये 'ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन' म्हणून देशभर विस्तारली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर मुस्लिम समाजात असा नेता झाला नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शब्बीर अन्सारी यांच्या प्रयत्नांमुळे जुलाह, मोमीन, अत्तार, कुरेशी, मुलाणी, पिंजारी, तांबोली अशा अनेक वंचित जातींमधील हजारो मुले आज डॉक्टर आणि इंजिनिअर होत आहेत. पूर्वी बोटावर मोजण्याइतकी मुले उच्च शिक्षणात होती, मात्र आज या समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती घडली आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या शोकसभेला प्रो. अश्फाक मकानदार, बापू मुल्ला, कासम मुल्ला, डॉ. नौशाद मोमीन, जहांगीर आत्तार, रफीक तांबोळी, अन्वर मुल्ला, रफीक मुल्ला, बाबासाहेब मुल्ला, मुसा कुलकर्णी, मुस्तकीम काझी (गारगोटी) यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.