निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ
schedule02 Aug 25 person by visibility 328 categoryराज्य

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना प्रथमच मानधन देण्यात येणार आहे.
अचूक आणि पारदर्शक मतदार यादी ही लोकशाहीसाठी भक्कम आधार असून निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्यासाठी आणि तिच्या पुनरावलोकनासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा हेतू व्यक्त केला आहे.
या नवीन तरतुदीनुसार बीएलओचे २०१५ पासूनचे मानधन रु. ६,००० वरून रु. १२,००० तर मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ प्रोत्साहन रक्कम रु. १,००० वरून रु. २,००० करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीएलओ पर्यवेक्षक यांना रु. १२,००० वरून रु. १८,००० वाढ करण्यात आली. एईआरओ यांना प्रथमच रु. २५,००० आणि ईआरओ यांनाही प्रथमच रु. ३०,००० मानधन देण्यात येईल.
याशिवाय, बिहारपासून सुरू झालेल्या या विशेष तीव्र पुनरावलोकन (SIR) मोहिमेसाठी बीएलओंना रु. ६,००० चे विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.