इचलकरंजीचे सुपुत्र आयएएस डॉ. किरण पाटील यांचा राज्य शासनाकडून विशेष गौरव
schedule02 May 26 person by visibility 112 categoryसामाजिक
भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ. किरण पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या मुख्य सचिवांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी राबविलेल्या 'सहज' प्रणाली आणि 'महसूल मित्र' या डिजिटल उपक्रमांची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.
डॉ. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तंत्रज्ञानामुळे जमिनीचे जुने नकाशे, सातबारा आणि विविध शासकीय कागदपत्रे आता नागरिकांना मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. महसूल मित्र या व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख झाले असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत आहे. सध्या पशुसंवर्धन व दुग्धविकास आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पाटील यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयात उपसचिव म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.