SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाहीडीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसादशिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षाआंतरराष्ट्रीय जनसंपर्क (PR) दिवस: संवादाच्या पलीकडचे एक व्यावसायिक पर्वकोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीनूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही - मंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

schedule13 Jun 26 person by visibility 180 categoryराज्य

शिरोळ :  खरीप हंगाम तोंडावर असताना खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आधार, पीओएस मशीन व क्यूआर कोड आधारित खत विक्री प्रक्रिया तातडीने बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खत विक्री सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शिरोळ तालुका हा कृषीप्रधान व प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी खत, बियाणे व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. मात्र शासनाने लागू केलेल्या ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे व्यवहार रखडत असून मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (एफएफएस) अंतर्गत 'अॅग्रिस्टॅक' प्रणालीद्वारे खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंगची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यात ५ जूनपासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र सुरुवातीपासूनच नेटवर्क, सर्व्हर आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एका आठवड्यात ३१ हजार ५२१ शेतकऱ्यांनी खतासाठी बुकिंग केले, तर ११ हजार ५३१ शेतकऱ्यांना क्यूआर कोड प्राप्त झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात केवळ १,३३१ टन खताची विक्री झाल्याचे दिसून येत आहे. यावरून बुकिंग आणि प्रत्यक्ष खत वितरणामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित होत आहे. बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी होणे, अंगठ्याचे ठसे न जुळणे, मोबाईल हाताळण्याबाबत अपुरी माहिती तसेच अॅप डाउनलोड आणि नोंदणी प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.
दुसरीकडे कृषी सेवा केंद्र चालकांनी लाखो रुपयांचा खतसाठा करून ठेवला असतानाही विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने त्यांच्याही व्यवसायावर परिणाम होत आहे. पेरणीच्या काळात वेळेत खते व बियाणे मिळाली नाहीत तर उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खते, बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धत तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes