कणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!
schedule10 Mar 26 person by visibility 114 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर करवीर तालुक्यातील कणेरी मठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ५ ते ९ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या पाच दिवसीय शिबिराचा समारोप सोमवारी, ९ मार्च रोजी झाला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. संजय शिंदे आणि सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे हा होता.
या पाच दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवकांनी कणेरी मठ परिसरात विविध सामाजिक व विधायक उपक्रम प्रभावीपणे राबवले. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती रॅली आणि प्रबोधनात्मक पथनाट्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थ महिलांसाठी 'होम मिनिस्टर' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित व्याख्यान सत्रात डॉ. जानकी भोईटे, डॉ. अभयकुमार बागडे, डॉ. सुनिता वाघमारे आणि तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी मार्गदर्शन केले. या सत्रांतून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि सामाजिक जबाबदारीची सखोल माहिती मिळाली.
शिबिराच्या समारोप प्रसंगी प. पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (श्री सिद्धगिरी संस्थान मठ) यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून विद्यार्थ्यांना शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन करत समाजसेवेचा मंत्र दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. भारत कोलगणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कणेरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. पी. वड्ड आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सचिन सातपुते यांनी केली, तर सूत्रसंचालन स्वरांजली सलगर व ऋतुजा शिंदे यांनी केले. शेवटी योगेश खेत्रे यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. भरत भालेराव, डॉ. सचिन सातपुते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.