पंधरा दिवसांत ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule10 Mar 26 person by visibility 104 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, नामदेव परीट यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि सहायक निबंधक ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते.
कोणताही कृषिविषयक लाभ यापुढे ॲग्रीस्टॅक नोंदीशिवाय मिळणार नाही. तसेच आता कर्जमाफी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ देताना ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याबाबत गावस्तरावर सरपंच, स्थानिक पदाधिकारी तसेच सोसायट्यांचे सचिव यांना सोबत घेऊन मोहीम स्वरूपात उर्वरित सर्व नोंदी पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. तालुकानिहाय आढावा घेताना त्यांनी मयत शेतकऱ्यांच्या आणि संपर्क होत नसलेल्या शेतकऱ्यांबाबतही विशेष सूचना दिल्या. मयतांच्या वारसांच्या नोंदी घेऊन आणि ज्यांच्याशी संपर्क होत नाही त्यांच्या बांधावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावाचे कृषी सहायकांमार्फत वाटप करून दैनंदिन आढावा घ्यावा. दररोज नवीन नोंदी करून येत्या पंधरा दिवसांत सर्व काम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या गावांचे काम १०० टक्के पूर्ण होईल, त्यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनाही प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या अधीनस्थ सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देऊन अभियान स्वरूपात ॲग्रीस्टॅक नोंदी पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या १७ व २४ मार्च रोजी याबाबत पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.