मोरेवाडी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन
schedule16 Oct 26 person by visibility 134 categoryराज्य
कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मोरेवाडी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (Automated Testing Station – ATS) कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये आधुनिक स्वयंचलित यंत्रणेद्वारे वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संबंधित वाहनमालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वाहन तपासणीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट आरक्षित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी वाहनमालकांनी प्रथम https://vahan.parivahan.gov.in/AFMS या संकेतस्थळावर जाऊन राज्य, जिल्हा व वाहनाचा प्रकार निवडावा. त्यानंतर ‘View ATS Centre’ या पर्यायाद्वारे चाचणी केंद्र निवडून ‘Book Appointment’ या पर्यायावर क्लिक करावे. उपलब्ध दिनांक व वेळेनुसार वाहन तपासणीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट निश्चित करून विहित शुल्क ऑनलाइन भरावे.
वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी मोबाइल क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. अपॉइंटमेंटमध्ये निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार वाहन तपासणी केंद्रावर सादर करावे. यावेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र तसेच वाहनास लागू असलेली व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD), स्पीड लिमिटिंग डिव्हाइस (SLD) आणि रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप यांसारखी आवश्यक कागदपत्रे व साधने वैध स्थितीत असल्याची खात्री करावी.
या केंद्रामध्ये वाहनांची तपासणी स्वयंचलित यंत्रणेद्वारे करण्यात येणार असून, केंद्राचे कामकाज टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनमालकांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून तपासणी प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.