दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून रोजी रंगणार 'शिवराज्याभिषेक सोहळा': ऐतिहासिक स्मृतींना उजाळा
schedule01 Jun 26 person by visibility 169 categoryसामाजिक
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला 'राज्यभिषेक' हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण असून, या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदाही दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२६ रोजी 'शिवराज्याभिषेक सोहळा' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 'अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती'तर्फे आयोजित हा सोहळा 'भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन' म्हणून '६ जून लोकोत्सव' या संकल्पनेतून साजरा केला जाणार आहे.
सोहळ्याचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होईल. पहिल्या दिवशी, ५ जून रोजी दुपारी ३:३० वाजता पाचाड येथील राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर ४:०० वाजता नाणे दरवाजा येथे युवराजांचे स्वागत आणि शिवभक्तांसह गड चढण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ४:३० वाजता युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते 'धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची...' या युद्धाकलेच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ होईल. तसेच रात्री होळीचा माळ येथे ढोलवादन, लेझीम आणि वारकरी संप्रदायाचा गजर, त्यानंतर 'जागर शिवशाहीरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा...' हा शाहिरी कार्यक्रम आणि शिरकाई मंदिर येथे गोंधळ असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, ६ जून रोजी मुख्य कार्यक्रमात सकाळी ७:०० वाजता युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर शाहिरी कार्यक्रम आणि पालखी आगमनाचे सोहळे पार पडतील. सकाळी १०:०० वाजता युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते महाराजांच्या उत्सवमूर्तीस व सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांनी अभिषेक केला जाईल. यानंतर 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हा पालखी सोहळा आणि दुपारी १२:१५ वाजता युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाला पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान केला जाईल. दुपारी १२:२५ वाजता महाराजांच्या समाधीस अभिवादन करून या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता होईल. या ऐतिहासिक लोकोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीने समस्त शिवभक्तांना केले आहे.