स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त ८ रोड स्विपिंग मशिन्सचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
schedule01 Jun 26 person by visibility 128 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आधुनिक व्हेईकल माऊंटेड रोड स्विपिंग मशिन्सचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील रस्ते स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती व कार्यक्षमता मिळवून देणाऱ्या या मशिन्समुळे कोल्हापूरच्या स्वच्छता अभियानाला नवी उभारी मिळणार आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महानगरपालिकेस एकूण ८ रोड स्विपिंग मशिन्स प्राप्त झाल्या असून प्रत्येक मशिनची किंमत रुपये ४६ लाख ४९ हजार इतकी आहे. या सर्व मशिन्सची एकूण किंमत रुपये ३ कोटी ७१ लाख ९२ हजार इतकी आहे. मशिनच्या हॉपरची क्षमता ३ घनमीटर असून त्यामध्ये १८० लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. स्विपिंग ब्रशची लांबी २.५ मीटर असून ही मशिन ताशी सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची प्रभावी स्वच्छता करू शकते. या मशिन्सच्या माध्यमातून आरआरबी रस्ते, नगरोत्थान अंतर्गत विकसित रस्ते, लिंक रोड तसेच शहरातील प्रमुख मार्गांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. धूळ नियंत्रणासह रस्ते स्वच्छतेचे काम अधिक परिणामकारकपणे होणार असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, महायुतीची सत्ता महानगरपालिकेत आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने शहर विकासासाठी विविध सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या या ८ रोड स्विपिंग मशिन्स शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या मशिन्सच्या साहाय्याने धूळ उडण्यावर नियंत्रण ठेवत रस्त्यांची प्रभावी स्वच्छता करता येणार आहे. शहरवासीयांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना महायुतीने जाहीर केलेल्या विकास अजेंड्यातील शहर स्वच्छता, रस्ते विकास व अन्य मूलभूत सुविधा यासंदर्भातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध विकासकामे राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर यातील एका मशिनची सासने मैदान ते डी मार्ट या रोडवर सर्व मान्यवरांच्या समोर प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदरचे मशिन आजपासून शहरातील मुख्य रस्ते स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहेत.
यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभपती विशाल शिराळे, महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, उप-सभापती दिपा ठाणेकर, मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फरास, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, संजय मोहिते, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका अर्चना पागर, राजनंदा महाडीक, प्राजक्ता जाधव, स्वाती कांबळे, सृष्टी जाधव, मंगला साळोखे, वंदना मोहिते, दिपाली घाटगे, अभिजीत खतकर, अभिजीत मोकाशी, उप-आयुक्त परितोष कंकाळ, माजी महापौर सुनल कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले आदी उपस्थित होते.