अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सन्मान
schedule01 Aug 26 person by visibility 155 categoryराज्य
पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित विशेष समारंभात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देऊन सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला. तसेच, देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यात अजित डोवाल यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, गुप्तचर यंत्रणेत आव्हानात्मक मोहिमा यशस्वी करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांच्या 'प्रोॲक्टिव्ह डिटरन्स'च्या संकल्पनेमुळे भारताची सुरक्षा रणनीती अधिक प्रभावी झाली असून भारत एक सामर्थ्यवान राष्ट्र बनले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी, हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे सांगितले. त्यांनी युवकांना लोकमान्य टिळकांच्या विचारांचे अनुकरण करत समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी केले.