कृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांक
schedule14 Feb 26 person by visibility 254 categoryसामाजिक
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून खासदार महोत्सवांतर्गत भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं आणि देवल क्लबच्या सहकार्यानं, चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त कराओके गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची अंतिम फेरी भिमा कृषी प्रदर्शनाच्या कार्यस्थळावर पार पडली. त्यामध्ये लहान गटात आदिती भराडे आणि मोठया गटात वसिम मुजावर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सादर झालेल्या एकाहून एक सरस गीतांनी प्रदर्शन स्थळावर वेगळाच माहौल तयार झाला होता.
चॅनेल बी च्या वर्धापन दिनानिमित्त खासदार महोत्सवांतर्गत भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं देवल क्लबच्या सहकार्यानं कराओके गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. स्पर्धेत लहान गट आणि मोठया गटात मिळून ८० स्पर्धक सहभागी झाले होते. देवल क्लबमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतील विजेत्या स्पर्धकांची अंतिम फेरी भिमा कृषी प्रदर्शनाच्या मंचावर पार पडली. स्पर्धेला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. लहान गटात आणि मोठया गटामध्ये स्पर्धकांनी आपल्या आवाजाची चुणूक दाखवत, एकसे बढकर एक गीतं सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. लहान गटामध्ये आदिती प्रशांत भराडे हीनं प्रथम क्रमांक, चेतना श्रीकांत किणेकर हीनं द्वितीय क्रमांक, ईश्वरी सागर शिंदे हीनं तृतीय क्रमांक पटकावला. तर पर्णिका ओंकार हिरेमठ हीला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आलं. मोठया गटात वसिम मुजावरनं प्रथम क्रमांक पटकावला. पंकज राजन यानं द्वितीय, गौरी शिंदे हीनं तृतीय क्रमांक पटकावला. तर आशितोष देशपांडे, रिया धुरे आणि चिन्मय पारकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसं देण्यात आली. तसंच स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मंगलताई महाडिक, साधना महाडिक, अरूंधती महाडिक, शिवानी पाटील, शितल तिरूके यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. यावेळी स्पर्धेचं परिक्षण किरण रणदिवे, डॉ. भाग्यश्री मुळीक, सुचित्रा मोर्डेकर यांनी केलं. यावेळी शरयू भोसले, सुप्रिया चौगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.