विधानसभा निवडणुकांचा धुरळा: पश्चिम बंगालमध्ये ९०%, तर तमिळनाडूमध्ये ८२% मतदान; बारामती-राहुरीचा कौलही मतपेटीत बंद
schedule23 Apr 26 person by visibility 110 categoryदेश
कोल्हापूर : देशातील राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. पश्चिम बंगालमध्ये मतदारांनी लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा करत पहिल्याच टप्प्यात तब्बल ९० टक्के मतदानाची नोंद केली. तमिळनाडूमध्येही २३४ जागांसाठी सरासरी ८२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले असून, मतदारांचा कल आता मतपेटीत बंद झाला आहे.
पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्यातील १६ जिल्ह्यांमधील १५२ जागांवर आज निवडणूक पार पडली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ९० टक्के मतदान झाले असून, दक्षिण दिनासपूर मतदारसंघात सर्वाधिक ९३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या टप्प्यात एकूण १,४७८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, मतदारांच्या या उदंड प्रतिसादामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात २३४ जागांसाठी मतदान पूर्ण झाले. राज्यात ५ कोटी ७३ लाख मतदारांपैकी ८२ टक्के मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांनीही मतदान केंद्रावर जाऊन नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी कोईमतूरमध्ये मतदान केले.
◼️बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन जागांवर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. दुपारी ५ वाजेपर्यंत बारामतीत ५२ टक्के, तर राहुरीमध्ये ५१ टक्के मतदान झाले. बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि अक्षय कर्डिले यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या रिक्त झालेल्या जागांवर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त आणि वेबकास्टिंगद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती.