वारणा विद्यापीठात २९ सप्टेंबरला ‘मेगा जॉब फेअर
schedule23 Sep 26 person by visibility 296 categoryशैक्षणिक
◼️ महारोजगार महाकुंभ मेळावा २०२६’; विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी
वारणानगर : वारणा विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहकार्याने ‘मेगा जॉब फेअर – महारोजगार महाकुंभ मेळावा २०२६’ चे आयोजन मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (TKIET), वारणानगर येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या व नियोक्ते सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांच्या सहकार्याने होणाऱ्या या जॉब फेअरचे समन्वयक प्रा. पी. जे.पाटील, टीपीओ, टी. के. आय. इ. टी वारणानगर हे आहेत.
या मेगा जॉब फेअरमध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी व उमेदवार सहभागी होऊ शकतात. यामध्ये अभियांत्रिकी (पदवी व पदविका), फार्मसी (पदवी व पदविका), एमबीए, एमसीए, आयटीआय, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.एस्सी., इयत्ता १०वी, १२वी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. फ्रेशर्स तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संबंधित कंपन्यांच्या पात्रता निकषांनुसार विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्यात नामांकित नियोक्त्यांशी थेट भेट, रोजगाराच्या विविध संधींचा शोध, भरती प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद आणि आपल्या करिअरची दमदार सुरुवात करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदांसाठी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वारणा विद्यापीठातील सर्व प्राचार्य तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट टीमकडून या उपक्रमासाठी सहकार्य केले जात आहे.
पात्र विद्यार्थी, फ्रेशर्स आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या महारोजगार महाकुंभ मेळाव्याचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वयक प्रा. पी. जे. पाटील यांनी केले आहे.