कोल्हापुरात बकरीद (ईदुल अजहा) मोठ्या उत्साहात साजरी; मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर पारंपरिक पद्धतीने नमाज पठण
schedule28 May 26 person by visibility 135 categoryसामाजिक
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण 'बकरीद' (ईदुल अजहा) गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी कोल्हापूरमध्ये सर्व धर्मियांनी मिळून अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा केला. आज शहरात सणाचा मोठा उत्साह पहावयास मिळाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर पारंपरिक पद्धतीने नमाज पठण सोहळा पार पडला. या ठिकाणी नमाज पठणासाठी एकूण तीन जमातींचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना विशेष मार्गदर्शन केले व नमाज पठण करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या जमातीच्या नमाजकरिता हाफीज मोहम्मदजैद मुल्ला तर तिसऱ्या जमातीसाठी मौलाना रहमतुल्लाह कोकणे यांनी नमाज पठण करून घेतले. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत 'ईद मुबारक'च्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे वातावरण अधिकच आनंदमय झाले होते.
या पवित्र प्रसंगी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवरांनी मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर हजेरी लावली होती. यामध्ये डी. वाय. एस. पी. प्रिया पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रितम कणेरकर, नगरसेवक अमर समर्थ, राजू लाटकर, मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, नासिर धारवाडकर, ताज मुल्लाणी, समीर काझी आणि दिलावर पठाण या मान्यवरांचा समावेश होता. या सोहळ्याला विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, छायाचित्रकार यांसह सर्व धर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे प्रशासक कादरभाई मलवारी यांनी केले, तर संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सर्वांचे आभार मानले. या पवित्र दिवशी कोल्हापूरची व देशाची एकात्मता, बंधुभाव टिकून राहावा तसेच सर्वत्र सुखाशांती आणि समृद्धी लाभावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना केली. सणानिमित्त उपस्थित मान्यवरांना मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदील फरास, संचालक हा. पापाभाई बागवान, हा. लियाकत मुजावर, हा. जहांगीर अत्तार, रफिक शेख, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार आणि अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते ईदचे विशेष पक्वान्न असलेल्या 'शिरखुरम्याचे' वाटप करून तोंड गोड करण्यात आले. संपूर्ण परिसरात बंधुभाव आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.