खिद्रापूर मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण व्हावे : आमदार यड्रावकर
schedule23 Jul 26 person by visibility 142 categoryराज्य
◼️जिल्हाधिकारी, सीईओ व आमदार यड्रावकर यांची खिद्रापूरला भेट
खिद्रापूर : खिद्रापूर येथील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील घरांबाबत उच्च न्यायालयाने रहिवाशांना मोठा दिलासा दिल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन आणि आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंदिर परिसराला संयुक्त भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासमोर ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या.
उच्च न्यायालयात शासनाच्या वतीने खिद्रापूरची वस्तुस्थिती आणि गावकऱ्यांच्या अडचणी प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंदिर संवर्धनासोबतच स्थानिकांच्या हक्कांचेही संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने कोणाचाही निवारा विनाकारण हिरावला जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबरोबरच ग्रामस्थांना न्याय मिळेल, यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजय परीट, जिल्हा परिषद सदस्य उत्तराताई शिंदे, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, विजीतबाबा शिंदे, दयानंद खानोरे, हिदायत मुजावर, रावसाहेब रायनाडे, हैदरखान मोकाशी, अण्णासाहेब कुरुंदवाड, मियाखान मोकाशी, प्रकाश रायनाडे, इर्शाद मुजावर, रामगोंडा पाटील, अशपाक ढालाईत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.