कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई: 'सान्वीक वेल्थ'चा मुख्य सूत्रधार ४ वर्षांनंतर गजाआड!
schedule04 Mar 26 person by visibility 156 categoryगुन्हे
▪️शिये येथून आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; ३ कोटी ६२ लाखांचा होता अपहार
कोल्हापूर : "चार महिन्यांत पैसे दुप्पट करून देतो," असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सान्वीक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. गोविंद शिवाजी पाटील (रा. शिये, ता. करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
आरोपीने कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथील आयोध्या टॉवरमध्ये 'सान्वीक वेल्थ मॅनेजमेंट' नावाने कार्यालय थाटले होते. अल्पावधीत दामदुप्पट परताव्याचे स्वप्न दाखवून त्याने अनेक गुंतवणूकदारांकडून सुमारे ३ कोटी ६२ लाख रुपये गोळा केले आणि त्यानंतर पोबारा केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये फसवणुकीसह MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात होती. आरोपी गोविंद पाटील हा शिये येथील राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती जालिंदर जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले.
नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही 'दामदुप्पट' आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोनि सुशांत चव्हाण, पोसई जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, महेश आंबी, अमित सर्जे, समीर कांबळे आणि सुशील पाटील यांनी केली.