डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घेतला चंद्रग्रहणाचा विलक्षण अनुभव
schedule04 Mar 26 person by visibility 500 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : खगोलशास्त्र क्लबतर्फे ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४२ ते ८:०२ या वेळेत चंद्रग्रहण व विशेष चंद्र निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास क्लबचे सुमारे ५० विद्यार्थी सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या दिवशी झालेल्या चंद्रग्रहणामुळे आकाशात एक अद्भुत खगोलीय दृश्य पाहायला मिळाले. पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध आल्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली आणि चंद्राचा रंग लालसर-तांबडा दिसू लागला. या अवस्थेला “रक्तचंद्र” असेही म्हटले जाते. उपस्थितांनी दुर्बिणीच्या साहाय्याने तसेच उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहणाचा टप्प्याटप्प्याने होणारा बदल अनुभवला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन खगोलशास्त्र क्लबचे समन्वयक प्रा. डॉ. बंडोपंत व्हनमोरे यांनी केले. त्यांनी चंद्रग्रहण का होते, त्यामागील वैज्ञानिक कारणे, पृथ्वीची सावली (उम्ब्रा व पेनुम्ब्रा), तसेच चंद्र लाल का दिसतो याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारून शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती जाणून घेतली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयीची जिज्ञासा अधिक वाढली असून विज्ञाननिष्ठ विचारसरणीला चालना मिळाली व खगोलशास्त्र क्लबचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक ए . के गुप्ता, प्राचार्य एस डी चेडे , रजिस्ट्रार एल व्ही मालदे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख एन. डी सांगळे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.