कोल्हापुरात लाचलुचपत विभागाचा मोठा धमाका! शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच ५ हजारांची लाच घेताना जाळ्यात
schedule05 Mar 26 person by visibility 130 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज एक मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या ७/१२ पत्रकावर वडिलांचे नाव लावण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणारा शिंगणापूरचा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) इरफान दिलावर सनदी आणि त्याला साथ देणारा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे या दोघांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ वर वडिलांचे नाव लावायचे होते. या कामासाठी तलाठी इरफान सनदी याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याप्रकरणी ४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
आज ५ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने शिंगणापूर तलाठी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तलाठी सनदी याच्या सांगण्यावरून उपसरपंच दीपक कांबळे याने लाचेची ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि ती टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला सांगितली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही झडप घालून ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांच्या शिंगणापूर आणि कोल्हापूर येथील घरांच्या झडतीसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या दोघांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तपास पथक: ही कारवाई ला.प्र.वि. कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.