माती आधारित शिक्षणाने विश्वाचे कल्याण शक्य : मल्लिकार्जुन कोरी; केआयटी मध्ये कै.शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला संपन्न.
schedule26 Mar 26 person by visibility 228 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने काल बुधवार ,२५मार्च २०२६ रोजी कै.शिवाजीराव देसाई स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेचे हे २० वे वर्ष आहे. यावर्षीचा व्याख्यानमालेचा विषय होता समृद्ध माती- समृद्ध जीवन. या विषयाची मांडणी करण्यासाठी प्रमुख वक्ते होते श्री मल्लिकार्जुन कोरी,कार्यकारी संचालक मोआ अॅग्रोटेक,नैरोबी,केनिया आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे.
आपल्या मार्गदर्शनात कोरी म्हणाले,“ भारताचे पूर्वीचे शिक्षण हे जमिनीशी नाते जोडणारे (सॉईल बेस्ड) होते तोपर्यंत भारतातील शेती ही उपजाऊ तसेच विविध प्रकारच्या पिकांसाठी अत्यंत गुणकारी होती.जसे जसे आपले शिक्षण ऑइल,केमिकल (ऑईल बेस्ड) यांच्याशी जोडले गेले तसे तसे आपले जमिनीकडील लक्ष कमी होत ते खनिज पदार्थाकडे केंद्रित केले गेले.” भारतातील शेतीच्या मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस ज्या पद्धतीने ढासळत चाललेली आहे त्या परिस्थितीवर त्यांनी विविध उदाहरणे देऊन भाष्य केले. आपल्या अनुभव संपन्न भाषणात ते पुढे म्हणाले, “ भारतातील महिला जोपर्यंत शेतीमध्ये लक्ष घालत होत्या तोपर्यंत घरातील कोणत्याही व्यक्तीला तिला शारीरिक आजार कमी होत होता.कारण शेतीमध्ये आंतर पिकाच्या माध्यमातून विविध औषधी वनस्पतींची लागवड महिलांकडून होत होती.जस जशा महिला शेतीपासून दुरावत गेल्या तस तशा घरामध्ये अनेक आजारांच्या समस्या अधिक द्रुढवत होत गेल्या. घरातल्यांनी काय खाल्ले पाहिजे याबाबतीत महिला सजग होत्या व त्याच प्रकारचे अन्न त्या निर्मित करत होत्या. पण आत्ताच्या काळात अनेक घरांमध्ये बाहेरूनच खाद्यपदार्थ मागवले जातात किंवा तयार पिठाच्या माध्यमातून ते पदार्थ केले जातात.ते कोणत्याही प्रकारची पौष्टिकता देत नाहीत उलट काही अवयवांच्या वरती त्याचा वाईट परिणाम होत आहे.”
“ केमिकल युक्त शेतीच्या प्रभावाने निसर्गाचे सर्वच चक्र उलटून पालटून टाकलेली आहे त्यामुळे अनेक रोगांनी आज मनुष्याचे जीवन भरलेले आहे. आपल्या जीवनशैलीत साखर, रिफाइंड ऑइल, मीठ, दूध यांचा तुम्ही उपयोग करू नये अशा प्रकारचा आग्रह त्यांनी उपस्थितांना केला. मनुष्याच्या दिनचर्येबाबत जगभरातील विविध तज्ञांच्या पुस्तकांचा, संशोधनांचा संदर्भ देत त्यांनी योग्य वेळी योग्य ती क्रिया आपण केली पाहिजे जेणेकरून निसर्गाने ठरवलेल्या त्या चक्रात आपण आपले जगणे सुसह्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निसर्ग नियमाने येणारी फळे, फळभाज्या, पालेभाज्या, रानभाज्या आपण अवश्य खाल्ल्या पाहिजेत असा आग्रहाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.शिंदे यांनी शेती, पीक व्यवस्थापन, आहारशास्त्र या सर्व विषयात भारतीय विचारधारेला बाजूला करून परकीय लोकांची विचारधारा अवलंबल्यामुळे सध्याची जल,जमीन,वायू यांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली असल्याबद्दल सांगितले. अनेक पुस्तकांचे दाखले देत त्यांनी भारतीय पीक पद्धती ही पर्यावरणतील प्रत्येक घटकाला कशी पूरक होती हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. शेवगा व मधमाशी यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे व ते एकमेकांना कसे पूरक आहेत हे त्यांनी कथन केले. अशा विचारांना आपल्या जीवनपद्धतीत समाविष्ट केले पाहिजे असे आवाहन त्यांनी अंतिमत: उपस्थित श्रोत्यांना केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी केले व या व्याख्यानमालेतील गत विविध विषयांचा संदर्भ देत या व्याख्यानमालेची आवश्यकता व त्यातून होणारे प्रबोधन याबाबत मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, रजिस्टर डॉ दत्तात्रय साठे यावेळी मंचावर उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अतिथी परिचय डॉ. दीप्ती कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.नीता पाटील यांनी केले. प्रा.अमर टिकोळे यांनी या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी योग्य समन्वय केले.या व्याख्यानासाठी केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय व आयमर चे सर्व अधिष्ठाता ,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,परिसरातील उद्योजक व अन्य विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.