शिरोळ तालुक्यात विविध शासकीय योजनांचा आढावा
schedule10 Jul 26 person by visibility 243 categoryसामाजिक
कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, उद्दिष्टपूर्तीचा तसेच मान्सून पूर्वतयारीचा तालुकास्तरीय आढावा घेण्यासाठी बैठक सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर येथे पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर, शिक्षण व अर्थ सभापती शितल यादव, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनिषा कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण विभागांतर्गत रमाई आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अटल, मोदी आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत बचत गटांची स्थापना, बँक कर्ज वितरण, समुदाय गुंतवणूक निधी (CIF) आणि ‘लखपती दीदी’ उपक्रमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षण विभागात शिक्षक समायोजन, शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीची कामे, तर समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधारणा योजना, स्वनिधी आणि चालू वर्षाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
जल जीवन मिशनची कामे, संभाव्य पाणीटंचाई तसेच शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची तयारी त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग आणि ग्रामपंचायतमार्फत कुपोषित बालकांसाठी NRC व CCDC मार्फत उपचार, अंगणवाड्यांचे विद्युतीकरण, लेक लाडकी व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देण्यात आली.
कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. तर पशुसंवर्धन विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, पशुधन लसीकरण व इयर टॅगिंगचा आढावा सादर करण्यात आला.
यावेळी विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) अभियानाची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच 13 जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश देण्यात आले.
प्रारंभी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रस्तावना तर मिलिंद कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व खातेप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.