SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणदुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : आमदार सतेज पाटील यांचा इशाराडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात जागतिक न्यूमोनिया दिन: आरोग्याची काळजी आणि जनजागृतीची गरजराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरवभगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजनगुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीरकृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा घोरपडवाडी येथे शेतकऱ्याच्या घरी दिवाळी फराळशिक्षण, क्रीडा व संघटनात्मक चळवळीचे दीपस्तंभ: आदरणीय डी. बी. पाटील सर!

जाहिरात

 

राऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघात

schedule12 Nov 26 person by visibility 120 categoryराज्य

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याबाबत संजय राऊत वारंवार वक्तव्ये करत आहेत. परंतु, संजय राऊत हे महान नेते असून ते राज्याचे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याला कोणाचे बंधन राहिलेले नाही, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला लगावला. कोल्हापूरमधील के. डी. सी. सी. बँक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आणि गोकुळ दूध संघ निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादावर सविस्तर भाष्य केले.

▪️आमच्या पक्षाची काळजी करू नका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा संजय राऊत करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आमच्या पक्षाची त्यांना एवढी काळजी का लागावी हेच समजत नाही. त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे, त्यांचे खासदार-आमदार किती आले आणि किती गेले, यावर ते बोलत नाहीत. विनाकारण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच बोलत असून त्यांनी आमच्या पक्षामध्ये नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व आमदार एकसंघ आहेत, कोणीही कुठेही जाणार नाही आणि आमदारांचा दुसरा गट होण्याची शक्यताच नाही, असे स्पष्ट करत मुश्रीफ यांनी पक्षांतर्गत फुटीच्या चर्चा फेटाळून लावल्या.

▪️महायुतीत मिठाचा खडा टाकू नका
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी पक्षात तिसरा गट निर्माण होऊ शकतो असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट किंवा त्यांचे रायगडमधील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नेत्यांबद्दल अत्यंत वाईट भाषेत टीका करत आहेत आणि बिनबुडाची वक्तव्ये करत आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांची समन्वय समिती असून, महायुतीमधील पक्षांवर कोणीही टीका करायची नाही असा निर्णय झाला असताना ही मंडळी थांबायला तयार नाहीत. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दांत यांना सूचना दिली पाहिजे, कारण हे लोक महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत आहेत, असे ते म्हणाले.

▪️दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर आणि भेटीच्या चर्चांवर स्पष्टोक्ती
दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले की, मी आठवडाभर मुंबईला गेलेलो नाही, गोकुळ आणि दिवाळीनिमित्त कोल्हापूरमध्येच आहे. कालच उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी सांगितले आहे की, योग्य वेळ येताच याची सर्व माहिती दिली जाईल. त्याबाबत योग्य तो निर्णय त्या आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब ठरवतील. ते जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही सर्वजण ठामपणे उभा राहू. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची काही आमदारांनी भेटीची वेळ मागितल्याबाबत विचारले असता, मी राष्ट्रवादीचा आमदार असून मला तसा कोणताही निरोप आलेला नाही, असे सांगत त्यांनी अशा बदनामीकारक चर्चा फेटाळून लावल्या. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबईला गेल्यानंतर त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणार आहे.

▪️गोकुळचा विषय संपला, आता दूध संकलनावर लक्ष केंद्रित करा
गोकुळ दूध संघाच्या निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या संघर्षावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी मोठा दिलदारपणा दाखवला. ते म्हणाले की, गोकुळ दूध संघाची अध्यक्षपदाची निवडणूक आता पार पडली आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, हा विषय आता संपवा. गोकुळ कसा चांगला चालेल, वाढेल आणि अमूलला कशी स्पर्धा करेल, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. अध्यक्ष निवडीवेळी चंद्रकांतदादा पाटील आणि माझ्या तोंडून रागापोटी काही शब्द गेले, जे गेले नसते तर बरे झाले असते. विरोधकांच्या संघर्ष मोर्चात वापरण्यात आलेली अवमानकारक चिन्हे आणि भाषेमुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते, त्यामुळे ती प्रतिक्रिया होती. आता तो विषय मागे पडला असून गेल्या सहा महिन्यांत प्रशासकीय मंडळाच्या काळात झालेले चुकीचे निर्णय बदलून ३० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी सर्व संचालकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

▪️दुधाला मिळणार सोन्याचा भाव
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत हरियाणा, मुरा, मेहसाणा या परराज्यातील जातिवंत दुधाळ म्हशी खरेदीसाठी दिलेले १० हजार रुपयांचे अनुदान वाढवून २० हजार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, एकवेळ ओला दुष्काळ परवडेल परंतु राज्यामध्ये कोरडा दुष्काळ पडलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाणी असल्यामुळे रब्बी पिके व जनावरांना चारा उपलब्ध होईल. दुधाळ म्हशी घेतल्यास येणारे दिवस दुधाला सोन्याचा भाव मिळवून देणारे ठरतील.

संजय राऊत आणि रवींद्र धंगेकरांच्या टीकेचा समाचार
संजय राऊत यांनी सत्तेतील वळू असा शब्दप्रयोग केल्याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले की, संजय राऊत असोत किंवा रवींद्र धंगेकर असोत, यांचा या गोष्टीशी मुळात संबंध काय? कशासाठी हे लोक बोलत आहेत? यांना कोणी सुपारी दिलीय का? कोल्हापूर जिल्हा आणि आमचे लोक कर्तृत्ववान आहेत, आम्ही ते बघून घेऊ. अशा पद्धतीने बाहेरचे लोक सातत्याने कोल्हापूर जिल्ह्याचा अपमान करत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

 तसेच सतेज पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले की, राजकारणात मैत्री आणि शत्रुत्व नसते, वेळोवेळी मते वेगवेगळी असतात. आम्ही दोघेही कोल्हापुरातच राहणार आहोत, एकमेकांसमोर आल्यावर नमस्कार-चमत्कार होणारच आणि ते वयाने लहान असल्यामुळे त्यांनी मला नमस्कार करावाच लागेल, असे सांगत त्यांनी राजकीय कटुता बाजूला ठेवण्याचे संकेत दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes