गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ
schedule11 Oct 26 person by visibility 197 categoryउद्योग
कोल्हापूर : महायुतीतील तिन्ही घटक पक्ष सहा महिने एकमेकांशी भांडत राहिले. त्यांनी प्राथमिक दूध संस्थांना अक्षरशः वेठीस धरले, नुरा कुस्ती खेळून फक्त खडखडी केली आणि आता निवडणुका जाहीर झाल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत. सर्व निर्णय मुंबईत घेणाऱ्या महायुतीचा अजेंडा गोकुळ संपवणे हाच असल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी केला. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुये येथे आयोजित ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील- सरूडकर राजीव आवळे, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीत पाटील, यांच्यासह मान्यवर व सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सत्तेसाठी एकत्र आलेल्या मंडळींचा गेल्या सहा महिन्यापासून चालेला तमाशा जिल्ह्याने पाहिला आहे. आमची लढाई साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या संसारासाठी आणि गोकुळ टिकवण्यासाठी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण जिवंत ठेवायचे असेल, तर गोकुळ टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. गोकुळ शेतकऱ्याच्या मालकीचा रहावा यासाठी समविचारी आघाडीच्या ‘शिट्टी’ या चिन्हावर उभे असलेल्या सर्व २५ उमेदवारांना विजयी करा आणि विकासाची शिट्टी वाजवा.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महायुतीचे नेते प्रत्येक निर्णयासाठी मुंबईवर अवलंबून आहेत. गोकुळला परावलंबी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ नको म्हणण्याची हिंमत दाखवू तुम्ही शकत नाही, त्यामुळे गोकुळ अमुलच्या घशात घालण्याविरुद्ध तुम्ही तोंड उघडू शकाल का ? असा सवाल त्यांनी महायुतीच्या नेत्यांना केला. महानंद बंद पाडल्यानंतर आता मुंबईतील गोकुळचे मार्केट अमूलच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, सतेज पाटील यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गोकुळला गरज आहे. एका नेत्याविरोधात जिल्ह्यातील महायुतीचे झाडून सारे नेते उतरले आहे. या सर्वांना कोल्हापूरचा स्वाभिमान दाखवून देण्याची गरज आहे.
माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, या निवडणुकीत जनमत हे समविचारी आघाडीच्या बाजूने आहे. गोकुळच्या चाव्या कोल्हापुरातच ठेवायच्या कि मुंबई, दिल्लीत याचा निर्णय स्वभिमानी शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, महायुती सरकारने प्रशासक, १४०० संस्था अपात्र अशा विविध मार्गांनी गोकुळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केले. गोकुळ वाचवण्याची ही शेवटची संधी असून समविचारी आघडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.
माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, ही लढाई मतदानाचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आहे.
माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, गोकुळच्या या निवडणुकीत कोणी भावासाठी, कोणी बायकोसाठी, कोणी मुलासाठी लढत आहेत. मात्र आ. सतेज पाटील शेतकऱ्याच्या हितासाठी लढत आहेत. मागीलवेळी शशिकांत पाटील चुयेकर याना चेअरमन करण्याची वेळ आली तेव्हा काही नेत्यांनी ‘वासरू संगोपन’ योजना आणल्याची टीका त्यांनी केली.
शशिकांत पाटील चुयेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, स्वर्गीय आनंदराव चुयेकर यानी तन,मन, धन अर्पण करून गोकुळची उभारणी केली. त्याकाळी माझ्या आजीचे सोने गहाण ठेवून त्यांनी गोकुळसाठी पैसे उभे केले. त्यांच्या शेवटच्या दिवसात भेटायला येणाऱ्यानाही गोकुळ शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवा असे आवाहन चुयेकर साहेब करत होते. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.
🔵 गोकुळ संपवण्याच्या महायुतीचा डाव
आमदार सतेज पाटील यांनी सांगितले कि, गुजरातमधील अमूल डेअरी परिसरात सरदार वल्लभभाई पटेल सहकारी डेअरी फेडरेशन हि मल्टीस्टेट संघटना स्थापन केली आहे. गोकुळला या फेडरेशनशी जोडून गोकुळचे अस्तित्व संपविण्याचा महायुतीचा डाव आहे. त्यासाठीच आतापासूनच गोकुळशी संबंधित सर्व निर्णय हे मुंबईतून घेतले जात आहेत.
🟣 खासदारांचे कुरघोडीचे राजकारण
राज्यसभा खासदार हे शशिकांत पाटील यांना चेअरमन का केले नाही असे विचारतात. प्रत्यक्षात शेवटच्या चेअरमन निवडीअगोदर या लोकानीच मुंबईत कुरघोड्या करून त्यांना चेअरमन पदापासून रोखले. हे खासदार बोलतात एक आणि करतात दुसरेच अशी टीका सुयोग वाडकर यांनी केली.
🟡 बावड्याचा हात निष्ठेचा
बावड्याचा हात निष्ठेचा आहे. त्यामुळे तुम्हाला तो हाती घ्यायला जमला नसावा. तर तुमचा हात मोठा म्हणूनच ईडी सीबीआयवाले मागे लावले. विचारधारेमुळे नाही तर ईडी मुळे ते एकत्र आले आहेत अशी टीका राजीव आवळे यांनी केली.
यावेळी गटनेते एकनाथ पाटील, राजू लाटकर, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, एम. आर. पाटील, सदाशिव चरापले, श्रीमती उदयानी साळुंखे, सौ. स्मिता गवळी, उमेश भोईटे, भिकाजी एकल, रणजीत पाटील, विश्वनाथ पाटील, रामराजे कुपेकर, सुभाष वाडकर, एस. के. पाटील, बबन रानगे, शशिकांत खवरे, कॉ. सम्राट मोरे, गणपतराव डोंगरे, निवास पाटील, भगवानराव जाधव, संभाजीराव देसाई, अमर पाटील- शिंगणापूरकर, प्रकाश पाटील, मोहन धुंदरे, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, पांडुरंग भांदिगरे, जीवन पाटील, श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, डी.एस. पाटील, विश्वास दिंडोर्ले, सखाराम चव्हाण, संग्राम पाटील, विश्वनाथ पाटील, सागर धुंदरे, संभाजीराव पाटणकर, सभापती सागर पाटील, सभापती छाया देसाई, दत्तात्रय वारके, निवास पाटील, मधुकर रामाणे, डॉ. के. एन. पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, सागर कोंडेकर, एकनाथ पाटील, विष्णुपंत एकशिंगे, हिंदुराव पाटील यांच्यासह समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हाभरातील ठरावधारक आणि दूध उत्पादक उपस्थित होते.