गोकुळ'च्या अध्यक्षाची आज हायव्होल्टेज निवडणूक; शासननियुक्त संचालकांमुळे राजकीय संघर्ष टोकाला
schedule10 Nov 26 person by visibility 130 category
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील निवडणूक पार पडत आहे. गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात सकाळी ११ वाजता ही निवडणूक सभा आयोजित करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष, शासननियुक्त संचालकांची वादग्रस्त भर आणि न्यायालयाचा दरवाजा यांमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
◼️संख्याबळ आणि कोरमचा पेच
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत २५ संचालक निवडून आले होते. यामध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी / समविचारी गटाकडे १३ संचालक आहेत, तर महायुतीकडे (हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक गट) १२ संचालक आहेत.
गोकुळच्या पोटनियमानुसार अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी ५०% हून अधिक म्हणजेच कमीत कमी १४ संचालकांची उपस्थिती (कोरम) आवश्यक असते. सतेज पाटील गटाकडे १३ जागा असल्याने त्यांच्याकडे एका संचालकाची कमतरता होती. त्यामुळे पहिल्या सभेला महायुतीच्या १२ संचालकांनी दांडी मारल्याने कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली होती. हाच कोरमचा पेच सोडवण्यासाठी आणि राजकीय समीकरणे बदलण्यासाठी राज्य सरकारने मोठा पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले.
◼️शासननियुक्त संचालकांमुळे वाद पेटला
कोरमचा पेच निर्माण झालेला असतानाच, राज्य सरकारने ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये ४ तज्ज्ञ संचालक नेमण्याचा अध्यादेश काढला. यानुसार गोकुळवर ४ शासननियुक्त संचालक नेमण्यात आले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
या निर्णयामुळे निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले. निवडून आलेल्या २५ संचालकांमध्ये सतेज पाटील गट आघाडीवर असला (१३ विरुद्ध १२), तरी यामध्ये ४ शासननियुक्त संचालक जोडल्यामुळे महायुतीचे पारडे १६ विरुद्ध १३ असे जड झाले आहे, असा दावा महायुतीकडून केला जात आहे. सरकारचा हा निर्णय लोकशाहीची आणि दूध उत्पादकांची गळचेपी करणारा असल्याचा आरोप करत सतेज पाटील गटाने कोल्हापुरात विशाल 'संघर्ष मोर्चा' काढून जोरदार निषेध नोंदवला होता. तसेच या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
◼️न्यायालयाचा निर्णय आणि मतदान प्रक्रिया
महाविकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी घेतली, मात्र न्यायालयाने या निवडणुकीवर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे आजची निवडणूक ठरलेल्या वेळेत होत आहे.
आजच्या प्रक्रियेत २५ निवडून आलेले संचालक आणि ४ शासननियुक्त तज्ज्ञ संचालक असे एकूण २९ संचालक मतदानात सहभागी होत आहेत. पारदर्शकता राहावी म्हणून २५ निवडून आलेल्या संचालकांची आणि ४ शासननियुक्त संचालकांची मते वेगवेगळ्या मतपेटीत ठेवून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी करण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकीचा अंतिम निकाल न्यायालयाच्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीच्या अधीन असणार आहे.
◼️अध्यक्षपदासाठी संभाव्य शर्यत
* महाविकास / समविचारी आघाडी: शशिकांत पाटील-चुयेकर
* महायुती: महायुतीची बैठक झाली झाली यामध्ये अध्यक्ष पदाच्या अंतिम नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी नावाची घोषणा झालेली नाही
◼️आज न्यायालयाच्या निर्देशानुसार अध्यक्षपदाची निवडणूक होत असली, तरी शासननियुक्त संचालकांच्या कायदेशीर वैधतेचा अंतिम निर्णय २५ नोव्हेंबरला न्यायालयात होणार असल्याने 'गोकुळ'च्या सत्तेची खरी सुत्रे कोणाच्या हातात जाणार, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
◼️दरम्यान गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमी वरती निवड स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दोन्ही समर्थकांना उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळे ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत..