विना परवाना व्यवसायांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई ; एक लॉज सील व तीन आस्थापनांना समज
schedule28 Jul 26 person by visibility 124 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर :महानगरपालिकेच्या परवाना, अग्निशमन, घरफाळा व विभागीय कार्यालय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केट यांच्या संयुक्त पथकाने सोमवारी शहरात विना परवाना व्यवसायांवर कारवाई करत एक लॉज सील केले. हि कारवाई बिन खांबी गणेश मंदीर येथील मयुरेश लॉजिंग या लॉजवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच या परिसरातील तीन व्यवसाय आस्थापनांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत समज देण्यात आली.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी विना परवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित व्यवसायधारकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, तीन व्यवसाय आस्थापनांनी नवीन व्यवसाय परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले असले तरी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप न केल्याने त्यांना समज देण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपआयुक्त किरणकुमार धनवाडे आणि सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक शिवाजी कोकरे, संदीप भोई, स्थानक अधिकारी विजय सुतार, घरफाळा व विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे कर्मचारी उपस्थित होते.