बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाई
schedule10 Jun 26 person by visibility 163 categoryमहानगरपालिका
🟠 अनधिकृत साहित्य कायमस्वरूपी जप्त; कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 2, छत्रपती शिवाजी मार्केट, इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संयुक्त विद्यमाने आज बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक तसेच ताराबाई रोड परिसरात अनधिकृत फेरीवाले व रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 4 लोखंडी हातगाड्या, 5 फायबर टेबल, 6 प्लायवूड पत्रे, 18 लोखंडी पाईप, 6 मोठ्या छत्र्या, 6 लोखंडी जाळ्या, 4 स्टँड बोर्ड, 1 काऊंटर तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच ताराबाई रोड येथील महानगरपालिकेच्या बहुमजली पार्किंगमधील गाळेधारकांना पूर्वी वाटप करण्यात आलेल्या गाळ्यांमधील केबिन्स रिकाम्या करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने विभागीय कार्यालय क्र. 2, इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत संबंधित केबिन्स निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने तसेच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत तसेच अतिक्रमण, इस्टेट व विभागीय कार्यालय क्र. 2 मधील कर्मचारी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.