डॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
schedule10 Jun 26 person by visibility 89 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांबाबत आज पदाधिकारी व प्रशासनाची संयुक्त बैठक महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली. बैठकीत डॉग शेल्टर उभारणी, शहरातील पथदिवे कार्यान्वित करणे तसेच जनरल बजेटमधून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
महासभेच्या मागील बैठकीत प्रभागांमध्ये डॉग शेल्टर उभारण्यास सदस्यांनी विरोध दर्शविल्याने प्रशासनाकडून पर्यायी जागांचा शोध घेण्यात आला होता. यामध्ये बापट कॅम्प, हलसवडे व पुईखडी येथील जागांचा विचार करण्यात आला. यावेळी हलसवडे येथील जागेबाबत आमदार अमल महाडीक यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच डॉग शेल्टरचे आराखडे तातडीने तयार करून सादर करण्याच्या सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना यावेळी दिल्या.
शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्याने सर्व सदस्यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मागील महासभेत शासनाने सुचविलेल्या कंपनीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून पूर्वीच्या ईईएसएल कंपनीविरोधात ब्लॅकलिस्ट व करार समाप्तीची प्रक्रिया अंतीम करण्यात आली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीचा गेले चार महिन्यातील कामाचा अनुभवाबाबत माहिती घेतली असता. बहुतांशी ठिकाणी त्या ही कमंपनीचे काम समाधानकारक नसल्याने त्यांना नोटीसा काढल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात महासभेचा ठराव शासनाकडे पाठवून महापालिकेला स्वतंत्रपणे नवीन ठेकेदार नियुक्त करण्यास विशेष परवानगी मिळावी यासाठी मंत्री महोदय व आमदारांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत सीएसआर निधीतून एलईडी पथदिवे उपलब्ध करून घेऊन महापालिकेमार्फत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना सांगितले की, पाणीपुरवठा, वेतन, कर्जफेड, जलसंपदा विभागाची देयके तसेच इतर अत्यावश्यक खर्च मिळून दरवर्षी सुमारे ३५० ते ४०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे उपलब्ध निधीचा वापर प्राधान्याने अत्यावश्यक सेवांसाठी करणे आवश्यक आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध विभागांचा नियमित आढावा घेतला जात असून चालू वर्षात उत्पन्नवाढ निश्चित दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काही विभागांमध्ये दरवाढीची आवश्यकता असल्याने त्यासाठी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
गटनेते शारंगधर देशमुख यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन मिळकती व नवीन जोडण्या शोधण्यावर भर देण्याची सूचना केली. सर्व सदस्यांना किमान 10 ते 15 लाख बजेट मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी जनरल बजेटमधील उपलब्ध निधीची माहिती प्रशासनाने प्रथम द्यावी व त्यानंतर सर्व पक्षांनी एकत्रितपणे निधी वाटपाबाबत निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले.
गटनेते आदिल फरास यांनी मागील पाच वर्षे प्रभागांना विशेष निधी मिळाला नसल्याने उत्पन्नाशी सुसंगत निधी सदस्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
नगरसेवक जयंत पाटील यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासन राबविणाऱ्या कारवाईला सर्व पदाधिकारी व नगरसेवकांचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. प्रशासनाचे बजेट जे सूचविले आहे त्याप्रमाणे उत्पन्न मिळावे. गटनेत्या प्रतिज्ञा उत्तूर यांनी सर्व सदस्यांना समान निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी पंचगंगा स्मशानभूमीजवळील शेणी ठेवणेचे शेडसाठी तातडीने निधी सोडण्याच्या सूचना केल्या.
महापौर रुपाराणी निकम यांनी महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सर्व पदाधिकारी व सदस्य प्रशासनाच्या पाठीशी राहतील. जनरल बजेटमधील निधीचा वापर प्राधान्याने ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी करावा, तर रस्त्यांची कामे शासनाकडून प्राप्त विविध निधीतून करण्यात यावीत असे सुचविले. तसेच प्रत्येक महिन्याचा विभागनिहाय उत्पन्नाचा अहवाल पदाधिकाऱ्यांसमोर सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीच्या शेवटी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामांची यादी प्रशासनाकडून महापौरांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर सर्व पदाधिकारी संयुक्तपणे त्यावर अंतिम निर्णय घेऊन महापौरांच्या स्वाक्षरीनंतर संबंधित पत्र प्रशासनाला सादर होईल त्यानंतर प्रशासनाकडून निधी वितरित करण्याबाबत नर्णय घेण्यात आला.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, नगरसेवक स्वरुप कदम, वैभव माने, नगरसेविका सौ.सृष्टी जाधव, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, कामगार अधिकारी राम काटकर, आस्थापना अधिक्षक प्राजक्ता चौगुले, कार्यशाळा प्रमुख संजय भोसले, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अमित दळवी उपस्थित होते.