‘गोकुळ’मध्ये एकमुखी कारभारासाठीच दूध उत्पादकांचा कौल; विजयानंतर आमदार सतेज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
schedule20 Oct 26 person by visibility 326 categoryराजकीय
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या बहुचर्चिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. गोकुळ दूध संघामध्ये एकमुखी आणि पारदर्शक कारभार असावा, अशी सर्वसामान्य दूध उत्पादकांची आणि सभासदांची तीव्र इच्छा होती; जनतेने दिलेला हा स्पष्ट जनादेश त्याच भावनेचे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निकालातील तांत्रिक बाबींवर भाष्य करताना आमदार सतेज पाटील यांनी अवैध मतांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, जनरल मतदारसंघातील ९८ मते बाद झाली होती, ज्यातील २० मते आमच्या ‘शिट्टी’ चिन्हावरच मारलेली होती. दुर्दैवाने तांत्रिक कारणांमुळे ही मते बाद न ठरती, तर आमच्या पॅनेलचे आणखी ७ ते ८ उमेदवार शंभर टक्के निवडून आले असते. तरीसुद्धा मिळालेल्या मतांची बेरीज पाहता, दूध उत्पादक सभासदांनी पूर्ण ताकदीने आमच्याच बाजूने कौल दिला आहे.
विरोधी गटाच्या फेरमतमोजणीच्या अर्जावर बोलताना त्यांनी नमूद केले की, पराभव स्वीकारताना विरोधकांनी खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती. मतमोजणीवेळी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच बाद मते निश्चित केली गेली होती. त्यामुळे विरोधकांच्या अर्जाला कोणताही कायदेशीर आधार नव्हता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमानुसारच योग्य निर्णय दिला आहे.
गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असून तिचे निर्णय कोल्हापुरातच व्हावेत, हीच दूध उत्पादकांची भूमिका होती. हा राजकीय लढा आम्ही साडेपाच लाख शेतकरी बांधवांना केंद्रबिंदू मानूनच लढला होता. त्यामुळे आता सत्ता हाती आल्यानंतर आगामी काळात या सर्व साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि दिलेल्या आश्वासनांची टप्प्याटप्प्याने अमलबजावणी करणे, यालाच आमचे प्राधान्य असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.