कोल्हापूरचा 'प्रणित' चमकला! राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवला नववा क्रमांक
schedule17 Jul 26 person by visibility 190 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा राज्यभरात डंका वाजला आहे. कसबा बावडा येथील मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर (शाळा क्र. 11) या शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी प्रणित प्रशांत पाटील याने महाराष्ट्र राज्य इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत संपूर्ण राज्याच्या गुणवत्ता यादीत नववा मानाचा क्रमांक पटकावला आहे.
एका सामान्य मनपा शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर चमकू शकतो, हे प्रणितने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने सिद्ध केले आहे. त्याच्या या असामान्य कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे.
प्रणितच्या या यशात त्याच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. विद्या पाटील यांच्या अविरत मार्गदर्शनाखाली प्रणितने हा यशाचा टप्पा गाठला, तर डॉ. अजितकुमार पाटील यांच्या प्रेरणेमुळे त्याला ही गरुडझेप घेणे शक्य झाले.
प्रणितच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, तसेच रसूल पाटील (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासाहेब कांबळे, आणि शिष्यवृत्ती परीक्षा विभागाचे संजय शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक-सेवक वर्गाने त्याचे अभिनंदन केले आहे. प्रणितचे हे यश कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.