'स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच स्वप्न बना'; कोल्हापुरात कानिफनाथ महाराजांचे प्रेरणादायी विचार
schedule12 Apr 26 person by visibility 146 categoryराज्य
कोल्हापूर: येथील रामकृष्ण हॉलमध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीज) यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना, "स्वप्नांचा पाठलाग करण्यापेक्षा स्वतःच एक आदर्श स्वप्न बना," असा मोलाचा संदेश दिला. जीवनातील अस्थिरता आणि संघर्षावर मात करण्यासाठी अध्यात्म, साधना आणि सेवा या त्रिसूत्रीचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या सोहळ्यात केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले. २०० गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले, तर अनेक गरजूंना वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले. तसेच, ३०० हून अधिक भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली. जिल्ह्यातील सर्व बारा तालुक्यांतून आलेल्या सुमारे १० हजार भाविकांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.
संप्रदायाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक कार्याची मोठी परंपरा निर्माण केली आहे, असे सांगत महाराजांनी सेवाभावी वृत्ती अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, येत्या १ मे रोजी आदर्श व्यक्तींचा गुणगौरव आणि १४ मे रोजी आसुले पोर्ले येथे वंदनीय नरेंद्र महाराज यांच्या भव्य प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.