छत्रपती शिवाजी मार्केट, महापालिका व केएमटी वर्कशॉपची आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडून पाहणी
schedule31 May 26 person by visibility 111 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज दुपारी छत्रपती शिवाजी मार्केट, उमा टॉकीज येथील महापालिकेच्या वर्कशॉपची तसेच बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉपची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, डॉ.विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे, कन्सल्टंट व संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
प्रारंभी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी महापालिकेजवळील छत्रपती शिवाजी मार्केटची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध गाळेधारकांशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायाबाबत, उत्पन्नाबाबत तसेच महापालिकेच्या भाडे भरण्याबाबत माहिती घेतली. बाजारातील दुकानांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी सर्व गाळेधारकांना महापालिकेचे भाडे नियमित भरण्याचे आवाहन केले. तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा महापालिकेमार्फत तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर त्यांनी मार्केट परिसरातील महापालिकेच्या विविध विभागांची पाहणी केली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व विभागांचा कर्मचारी वर्ग व कामकाजाची माहिती घेऊन विविध विभागांचे विभागीय कार्यालय निहाय एकत्रीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. इस्टेट, घरफाळा व विद्युत विभाग हे संबंधित क्षेत्रातील सहाय्यक आयुक्तांच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे कार्यरत राहतील, अशा सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर आयुक्तांनी उमा टॉकीज येथील महापालिकेच्या वर्कशॉपला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. वर्कशॉपमध्ये असलेली १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने तातडीने लिलाव प्रक्रियेतून कमी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच उपलब्ध स्क्रॅपचा लवकरात लवकर ई-ऑक्शन करावा व वाहनांचा दैनंदिन देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम नियमितपणे राबवावा, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉपमध्ये सुरू असलेल्या ई-बसेसच्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. विशेषतः उभारण्यात येणाऱ्या ई-बस चार्जिंग स्टेशनच्या कामाचा आढावा घेत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शहरामध्ये ई-बस सेवा लवकर सुरू होण्यासाठी चार्जिंग स्टेशन, वर्कशॉप, इलेक्ट्रिक कामे तसेच त्या ठिकाणची प्रशासकीय इमारतीची उर्वरित सर्व कामे ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिले.