कोल्हापूर: एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिला चोरट्यास पुण्यातून अटक; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
schedule31 May 26 person by visibility 110 categoryगुन्हे
कोल्हापूर : येथील सी.बी.एस. एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
दि. २४ मे २०२६ रोजी एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलांचे दागिने चोरले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकाने तांत्रिक तपास करत पुण्यातून सविस्तर तपास करून सविता गोविंद अवताडे (वय ४०, रा. सिंहगड रोड, पुणे) या महिलेला ताब्यात घेतले. तिने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून, तिच्याकडून एकूण २ लाख ८९ हजार ८०० रुपये किमतीची २७.५४० ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसूत्र जप्त करण्यात आली आहेत. या यशस्वी कारवाईमुळे कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.