SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरवजागतिक आरेखन दिन: सर्जनशीलतेचा उत्सवकोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटकआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणीजागतिक बौद्धिक संपदा दिननदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबडोदा बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या कबनूरकर भावंडांचे यशआद्य शंकराचार्य जयंती उत्सव रविवारपासून; आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

जाहिरात

 

भुंगे पकडा, हुमणी रोखा!, उद्यापासून जिल्ह्यात किड नियंत्रण स्पर्धा

schedule25 Apr 26 person by visibility 231 categoryराज्य

कोल्हापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने 'हुमणी कीड नियंत्रण जिल्हास्तरीय स्पर्धा' जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही स्पर्धा राबवली जाणार असून, हुमणी या पिकांसाठी अत्यंत घातक किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देण्याचा उद्देश आहे. हा उपक्रम पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून, शेतीतील उत्पादनवाढ आणि नुकसान टाळण्यासाठी हा एक प्रभावी पाऊल मानला जात आहे.

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी किड असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव झाल्यास ऊस, भात, मका, भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विशेष म्हणजे, ही किड थेट दिसत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. मात्र पावसाच्या पहिल्या सरीनंतर संध्याकाळच्या वेळेत जमिनीतून बाहेर पडणारे भुंगे हेच हुमणीच्या वाढीचे मूळ असतात. या भुंग्यांना वेळीच पकडून नष्ट केल्यास पुढील पिढी तयार होण्यापासून रोखता येते. त्यामुळेच 'भुंगे पकडणे' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा कालावधी २७ एप्रिल २०२६ ते १० जून २०२६ असा निश्चित करण्यात आला असून, सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उलट, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून व्यापक जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना 'प्रकाश सापळे' किंवा 'कामगंध सापळे' वापरणे अनिवार्य आहे. प्रकाश सापळा पद्धतीत शेतात साधारण ५.४ फूट आकाराचा व १ फूट खोल खड्डा करून त्यात पाणी व कीटकनाशक टाकले जाते आणि त्यावर बल्ब लावला जातो. प्रकाशाकडे आकर्षित होणारे भुंगे त्यात पडून नष्ट होतात. तसेच कामगंध सापळ्यांमध्ये विशिष्ट रासायनिक गंधाचा वापर करून भुंगे आकर्षित करून पकडले जातात.

पकडलेले भुंगे दररोज मोजून बीटीएम, एटीएम, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक गावातील हुमणी प्रादुर्भावाची नोंद ठेवणेही शक्य होणार आहे. स्पर्धेच्या शेवटी प्रत्येक तालुक्यातून सर्वाधिक भुंगे जमा करणाऱ्या ५० शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ बक्षिसांपुरते मर्यादित न राहता, सहभागी शेतकऱ्यांना कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठांमार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळणार असून, कीड व्यवस्थापनाबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes