बिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्त
schedule17 Mar 26 person by visibility 381 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बिद्री (ता. कागल) येथे मोठी कारवाई केली असून, १,५३,५५२ रुपये किमतीचा अवैध गुटखा साठा जप्त केला आहे.
राज्य शासनाने गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी घातली असतानाही, बिद्री-कोल्हापूर रोडवरील मटण मार्केट समोरील 'विघ्नहर्ता ट्रेडर्स' या दुकानात बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांच्या पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी सदर दुकानावर छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी उदय भिकाजी ढेकळे (वय ३९, रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी असा एकूण १ लाख ५३ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.
संशयित आरोपीला पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पीएसआय जालींदर जाधव, अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहीत मर्दाने आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.