ई प्रवर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावी
schedule16 Mar 26 person by visibility 110 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था ई प्रवर्गातील आहेत व अशा संस्थांची पंचवार्षिक निवडणुक अद्यापही झालेली नाही/ प्रलंबित आहे, अशा संस्थांनी त्यांच्या स्तरावर नामतालिकेवरील निवडणुक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करून निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावयाची आहे. ही नामतालिका जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भूविकास बँक, पहिला मजला, कोल्हापूर कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, याबाबतचा निवडणुकीचा निकाल (ई-9) निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत या कार्यालयास सादर करावा. संस्थेने निवडणुक न घेतल्याचे निदर्शनास आल्यास याबाबत या कार्यालयाच्या स्तरावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर शहर सहकारी संस्थेचे उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कब (1) नुसार, संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्यासाठी व त्यासाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधीक्षण, निदेशन व नियंत्रण हे राज्य शासनाने याबाबतीत घटित केलेल्या “राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण” या नावाने ओळखल्या जाणा-या प्राधिकरणाकडे निहीत असेल, असे नमुद आहे. त्यास अनुसरुन, ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये 250 पेक्षा कमी सभासद आहेत, अशा संस्था निवडणुकीच्या अनुशंगाने ई प्रवर्गात मोडतात.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील नियम 76 तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणुक) (प्रथम सुधारणा) नियम 2019 अन्वये, ई प्रवर्गातील संस्थामधील निवडणुकीबाबतचे अधिकार संस्थेला आहे.