युवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीस
schedule23 Jun 26 person by visibility 174 categoryराज्य
मुंबई: पावसाळी अधिवेशनादरम्यान कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यामध्ये पसरलेल्या अमली पदार्थांच्या विळख्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. तरुणाईला विनाशाकडे नेणाऱ्या या नशामुक्त मोहिमेसाठी प्रभावी पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, सरकारी रुग्णालयांमध्ये ५० बेडची मोफत नशामुक्त केंद्रे सुरू करणे आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यात सुधारणा करून कायदेशीर प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली.
या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चित्रपट किंवा इतर माध्यमांतून होणारे नशेशी संबंधित उदात्तीकरण रोखण्यासाठी सेन्सर बोर्डाने आधीच नियमावली तयार केली आहे. अशा प्रकारच्या उदात्तीकरणावर कडक कारवाई केली जाईल. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात नशामुक्त केंद्र उभारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला निर्देश दिले आहेत.
एनडीपीएस कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार स्तरावर कारवाई सुरू असून, राज्यानेही आपले सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. युवकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून, यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.