सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद
schedule07 Apr 26 person by visibility 118 categoryआरोग्य
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामांच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दि. ७ एप्रिल २०२६ पासून रुग्णालयाच्या मुख्य कमानीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात येत आहे. गोदावरी गेटचे काम पूर्ण होईपर्यंत अपघात विभागासमोरील गेट रुग्णालयात प्रवेशासाठी खुले ठेवण्यात येणार असून, बाहेर जाण्यासाठी कुंभी गेटचा वापर करण्यात येणार आहे.
या कालावधीत रुग्णसेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.