SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहगोकुळ निवडणुक : स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या समाधीला माजी संचालकांचे अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला अभिवादनगणपती बाप्पा मोरया! राज्यभरात गणेशोत्सवाचा मंगल व उत्साही प्रारंभ; लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमनगोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजनसांगलीत महाराष्ट्र राज्य फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद; राज्यातील २५० खेळाडूंचा सहभागहुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यास गंभीर मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईपहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; ६ विजेते घोषितकोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेतगणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान... हिंदी भाषा: भारतीय संस्कृतीचा आणि एकतेचा अनमोल दुवा

जाहिरात

 

गणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान...

schedule14 Sep 26 person by visibility 358 categoryसामाजिक

▪️एक चिंतनीय व वैचारिक लेख

▪️प्रस्तावना: उत्सवाचा मूळ हेतू काय?
१८९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तेव्हा त्यामागे स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकणे आणि समाजाला एकत्र आणून प्रबोधन करणे हा हेतू होता. त्या काळी गणेश मंडप हे स्वातंत्र्याचे व्यासपीठ होते. आज २०२६ मध्ये स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली, पण आजच्या मंडपांनी कोणते प्रबोधन करायचे? 

आज कोल्हापूर शहरात २५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाचा सरासरी खर्च ३ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत आहे. जर या सर्व मंडळांनी केवळ ५% रक्कम जरी सामाजिक कार्यासाठी वापरली, तर कोल्हापुरात एकाही शाळेत पिण्याच्या पाण्याची टंचाई राहणार नाही, एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. म्हणूनच यावर्षीचा संदेश आहे - *मिरवणूक मोठी नको, विचार मोठा हवा.*
मला या लेखामध्ये पाच प्रमुख विषयांचे गंभीर्य ओळखून चिंतनीय विचार सांगण्याचे व समाजामध्ये चर्चा घडवून आणून बदल होणे गरजेचे आहे. जे प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या कार्यक्रम व कार्यपत्रिकेत घ्यायलाच हवेत.

१.ध्वनी प्रदूषण: भक्तीचा आवाज की त्रासाचा?
▪️परिस्थितीचे गांभीर्य :
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार गणेशोत्सवाच्या १० दिवसात कोल्हापुरातील ध्वनी पातळी ८५ ते ११५ डेसिबल पर्यंत जाते. WHO नुसार ८५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज ८ तासांपेक्षा जास्त ऐकला तर कायमचे बहिरेपण येऊ शकते. आपल्या मंडपाशेजारी असलेले ७० वर्षांचे आजोबा, रुग्णालयातील पेशंट, १०वी-१२वीचा अभ्यास करणारा विद्यार्थी याचा आपण कधी विचार करतो का?

कायदा सांगतो रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकर बंद. पण कायदा पाळणे म्हणजे भक्ती कमी होणे नाही. खरी भक्ती शांततेत असते.

▪️मंडळाने काय करावे? 
१.  *बॉक्सची दिशा बदला:* स्पीकर रस्त्याच्या दिशेने न लावता मंडपाच्या आतल्या बाजूला लावा.
२.  डीजे ऐवजी ढोल: कोल्हापूरचे ढोल-ताशा पथक, हलगी, सनई-चौघडा हे आपले वैभव आहे. एका डीजे ला ५०,००० रुपये देण्यापेक्षा १० ढोल वादकांना रोजगार द्या.
३.  ध्वनी रक्षक पथक: मंडळातील २ तरुणांना "ध्वनी रक्षक" बनवा, त्यांच्याकडे डेसिबल मीटर अॅप असू द्या.

४.  शांततापूर्ण आरती: दिवसातून एक आरती कोणत्याही माईकशिवाय, फक्त टाळ-मृदंगावर करा.

▪️या विषयावरील प्रभावी घोषवाक्य:
 "डीजे चा दणका नाही, ढोलाचा ठोका देऊया! - ध्वनी प्रदूषण टाळूया!"
 "बाप्पा शांततेचा, उत्सव आनंदाचा - १० नंतर लाऊडस्पीकर बंद ठेवूया!"
 "कानाचे आरोग्य जपू, अभ्यास करणाऱ्याला जपू!"

२. प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव: निर्माल्याची योग्य विल्हेवाट

▪️परिस्थितीचे गांभीर्य:
एका गणेश मंडपात रोज २०० ते ५०० प्लास्टिक पिशव्या, १००० प्लास्टिक कप आणि थर्माकोलचा कचरा निघतो. हा कचरा थेट पंचगंगा नदीत आणि रंकाळा तलावात जातो. प्लास्टिकमुळे मासे मरतात, पाणी दूषित होते. आपण बाप्पाची पूजा करतो आणि त्याच बाप्पाच्या निर्माल्याने नदी मारतो, हा विरोधाभास नाही का?

◼️मंडळाने काय करावे? -
१.  मूर्ती आणि मकर: १००% शाडूची मूर्ती, नैसर्गिक रंग, बांबू-कापड-इको-फ्रेंडली मकर. POP वर पूर्ण बंदी.
२.  प्रसाद व्यवस्था: प्लास्टिक पिशवी बंद. पत्रावळी-द्रोण किंवा भाविकांनी घरून ताट आणावे. पाण्यासाठी माठ आणि स्टीलचा ग्लास.
३.  निर्माल्य कलश: मंडपाबाहेर दोन कलश - एक फुलांसाठी, एक प्लास्टिकसाठी. महानगरपालिकेच्या मदतीने त्याचे खत बनवा.
४.  कापडी पिशवी वाटप: वर्गणीतून ५०० कापडी पिशव्या छापून "माझे मंडळ प्लास्टिक मुक्त" म्हणून वाटा. हीच मोठी जाहिरात.

*या विषयावरील प्रभावी घोषवाक्य:*
 "प्लास्टिक हटाव, पंचगंगा वाचाव - निर्माल्य कलशात टाकू!"
 "शाडूचा बाप्पा, पर्यावरणाचा पापा - थर्माकोलला सांगा टाटा!"
 "कापडी पिशवी वापरा, कोल्हापूर सुंदर करा - माझा बाप्पा इको-फ्रेंडली!"

३.व्यसनमुक्ती कार्य: तरुणाई वाचवणे हेच खरे पुण्य

▪️परिस्थितीचे गांभीर्य:
गणेशोत्सवाच्या वर्गणी आणि मिरवणुकीच्या नावाखाली अनेक मंडळांमध्ये रात्री पार्टी होते. १८ ते २५ वयोगटातील ४०% तरुण गुटखा, तंबाखूच्या व्यसनात आहेत. एका मंडळाचा कार्यकर्ता व्यसनाने बरबाद झाला तर संपूर्ण मंडळाचे नाव खराब होते.

गणपती बुद्धीचा देवता आहे, व्यसन बुद्धीला नष्ट करते. मग आपण बुद्धीच्या देवतेच्या नावाने बुद्धी नष्ट करायची का?

▪️मंडळाने काय करावे? 
१.  व्यसनमुक्ती प्रतिज्ञा: १० दिवसात एक दिवस "व्यसनमुक्ती शपथ" दिवस पाळा. सर्व कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घ्यावी.
२.  व्याख्यान नाही, संवाद: पोलीस, डॉक्टर किंवा व्यसन सोडून यशस्वी झालेल्या व्यक्तीला बोलवा. भाषण १० मिनिटांचे, संवाद ५० मिनिटांचा.
३.  खेळातून मुक्ती: रात्री जागरणात मोबाईल रील नाही, तर मंडपातच कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी,लेझिम,खो खो स्पर्धा.

*घोषवाक्य:*
 "व्यसन सोडा, आयुष्य जोडा - गणपती बाप्पा मोरया!"
 "दारू-गुटख्याला लाथ, बाप्पाचा हात हातात - तरुणाई जागी हो!"
 "नशा मुक्त मंडळ, हेच खरे बळ!"
४.शाळा दत्तक योजना: शिक्षणातून समाजसेवा

◼️परिस्थितीचे गांभीर्य:
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ७१ शाळांपैकी २५ शाळांमध्ये अजूनही पुरेसे भौतिक सुविधा पुरेशा नाहीत, ग्रंथालय नाही, रंगरंगोटी दिसत नाहीत. त्यासाठी एका मंडळाची एका दिवसाची लायटिंग २५,००० रुपयांची असते, त्यात एका शाळेचे ६ महिन्याचे ग्रंथालय होते.

१.  एक मंडळ, एक शाळा: आपल्या प्रभागातील एक जिल्हा परिषद शाळा दत्तक घ्या.
२.  काय द्याल? २० बेंच, पाण्याचा फिल्टर,संगणक,५०० वह्या, खेळाचे साहित्य.
३.  बाप्पाच्या साक्षीने वाटप: विसर्जनाच्या दिवशी नाही, तर पहिल्या दिवशी शाळेत जाऊन वाटप करा, मुलांना आशीर्वाद द्या.

▪️घोषवाक्य:
 "वर्गणीचा पैसा, शिक्षणासाठी वापरा - एक मंडळ, एक शाळा!"
 "मंडप मोठा नाही, मन मोठे करा - बाप्पाचा प्रसाद वह्या-पुस्तकांचा!"
 "शाळा दत्तक घेऊ, भविष्य घडवू!" 

५.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत: खरी आराधना

▪️परिस्थिती: इयत्ता १०वीत ९०% मिळवणारा पण फी भरू न शकणारा विद्यार्थी आपल्या प्रभागात आहे. त्याला ५००० रुपयांची मदत त्याचे आयुष्य बदलू शकते.त्यासाठी 
"गणेश ज्योती शिष्यवृत्ती" सुरू करा. ५ विद्यार्थी निवडा. त्यांची पूर्ण वर्षाची शैक्षणिक जबाबदारी घ्या.
गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत: खरी आराधना

घोषवाक्य:  "गरिबाच्या लेकाला शिकवू, बाप्पाचे नाव उंचवू! 
"विद्यादान हेच खरे 
पुण्यदान - फी मुळे
शिक्षण थांबणार नाही!"
 "एक विद्यार्थी घडवू, 
एक कुटुंब उंचवू!"

▪️समारोप:
 "मंडळांनी ठरवले तर कोल्हापूर बदलू शकते. डीजे बंद केला तर कान वाचतील, प्लास्टिक बंद केले तर नदी वाचेल, व्यसन सोडले तर तरुण वाचेल, शाळा दत्तक घेतली तर पिढी घडेल."

▪️म्हणूनच यावर्षीचा संकल्प:
*"गणपती बाप्पा मोरया - सामाजिक भान राखूया!*
*उत्सव आनंदाचा, प्रबोधनाचा आणि परिवर्तनाचा!"*

जय हिंद....

✍️ लेखक व मार्गदर्शक: डॉ. अजितकुमार पाटील,
 केंद्र मुख्याध्यापक, राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र ११, कसबा बावडा, कोल्हापूर.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes