जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला देणार चालना : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule09 Aug 25 person by visibility 113 categoryराज्य

▪️रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण
▪️महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे होणार वितरण
▪️महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
▪️पिंक ई - रिक्षा योजनेचा लाभ घेऊन उन्नती साधा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : महिलांची उन्नती साधत त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पिंक ई - रिक्षा योजनेच्या धर्तीवर महिला व बालविकास विभागाच्या योजना अधिक आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. याच दृष्टीने महिलांच्या विकासाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून महिलांच्या नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोयेल जॉर्ज, फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय आदी प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कल्याणासाठी अनेक निर्णय घेण्यात येत असून सामाजिक संस्थांतील समुपदेशकांचा पगारवाढ, संरक्षण अधिकाऱ्यांचा पगारवाढ तसेच बालसंगोपन योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत निधी वितरित होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. महिला व बालविकास विभागाबरोबरच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम होत आहे. या विभागाबरोबरच माविमचे काम अधिक गतिमान करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे सांगून महिलांनी लोणची, पापड उद्योगाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
▪️महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे होणार वितरण : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई - रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. पिंक ई रिक्षा ही चार्जिंगवर चालणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस सिस्टीमसह रिक्षात बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र काढण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. राज्यात यावर्षी १० हजार ई रिक्षा वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी प्राप्त झालेल्या ७०० अर्जांपैकी ४०० महिला लाभार्थी पिंक रिक्षा साठी कोल्हापूर शहरात पात्र ठरल्या आहेत. येत्या काळात विमानतळ, पर्यटन स्थळे अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षाचा वापर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या माध्यमातून ३२ हजारांहून अधिक महिला जोडल्या गेल्या असून त्यांचे कर्ज परफेडीचे प्रमाण ९९.९९ टक्के आहे. महिलांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येत असून मुलाच्या नावानंतर आईचे व नंतर वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वाढवण्यात आले आहे. पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीबाबतही कार्यवाही होईल. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी बचत गट भवनची उभारणीसह महिलांच्या विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया. कोल्हापुरी चप्पल निर्मिती उद्योग तसेच महिलांसाठीच्या अन्य नाविन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के निधीतून तरतूद व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिला कल्याणसाठीच्या सर्व योजना भविष्यातही सुरु राहतील. महिलांनी सर्वच क्षेत्रात नाव कमावले असून पिंक इ रिक्षा योजनेचा लाभ घेऊन या क्षेत्रातही महिलांनी नाव कमवावे व संसाराला हातभार लावत आर्थिक उन्नती साध्य करावी, असे त्यांनी सांगितले.
खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास त्यातून चांगला परिणाम घडतो. शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्यास आर्थिक उन्नती कशी साध्य होते हे या योजनेच्या लाभार्थ्यांवरुन दिसून येईल. प्रदूषण मुक्त ई रिक्षा असल्यामुळे प्रदूषण रोखले जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरणाची योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत रिक्षाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज खासगी बँकांकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असून 20 टक्के आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे. महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्यासाठी ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलेले भारुड, पोवाडा व लोककलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.