महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजना
schedule30 Mar 26 person by visibility 85 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील, (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य' (सन 2025-26) योजना राबविण्यात येत आहे.
सन 2025-26 मध्ये महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबधितांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर सुचनांचे पालन करत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
योजनेविषयी भविष्यात कोणतीही माहिती, सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी 10 हजार रुपये व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 5 हजार रुपये इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार असून ऑनलाइन संकेतस्थळावर 27 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालकांनी केले आहे.