१११ व्या वर्षीही 'मतदाना'चा ध्यास; कोल्हापूरच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत आजींची यशस्वी नोंदणी
schedule13 Jul 26 person by visibility 137 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) 2026 मोहिमेअंतर्गत महापौर रुपाराणी निकम यांनी आज आपल्या प्रभागातील 111 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अनुसया किसन लाखे यांची गृहभेट घेऊन त्यांची नोंदणी करून घेतली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत गृह भेटी द्वारे मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्यात येत आहे. मतदार यादीची अचूकता राखणे, स्थलांतरामुळे झालेल्या बदलांची नोंद करणे तसेच अपात्र, मृत व दुबार नावे वगळणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात या मोहिमेकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, तसेच शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी संग्रामसिंह निकम, बीएलओ विक्रांत वासूदेव व स्थानिक नागरिक उपस्थित होते.