SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ : महापौर रुपाराणी निकम१११ व्या वर्षीही 'मतदाना'चा ध्यास; कोल्हापूरच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत आजींची यशस्वी नोंदणीनृसिंहवाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडून चरस तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईशिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरनेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करारपालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणीप्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यानजागतिक रॉक डे: संगीताच्या दुनियेतील बंडखोर आणि ऊर्जेचा महासोहळा!

जाहिरात

 

पालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी

schedule13 Jul 26 person by visibility 188 categoryराज्य

कोल्हापूर जिल्ह्यात ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी

कोल्हापूर : बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. 'एक दिवस बळीराजासाठी' या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.

जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक भेट न देता, पालकमंत्र्यांनी थेट भातखाचरात उतरून चिखलणीच्या कामात रोटावेटर चालवला. त्यानंतर हातात भाताची रोपे घेत महिला भगिनी व शेतकऱ्यांच्या सोबतीने पारंपरिक पद्धतीने रोपलावण केली. शेताचे बांध मजबूत करण्याच्या कामातही त्यांनी हातभार लावला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट आपल्यासोबत चिखलात काम करत असल्याचे पाहून स्थानिक शेतकऱ्यांमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला.

रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने यावेळी शेतात प्रत्यक्ष 'जीवामृत' तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जीवामृतासाठी लागणारे आवश्यक घटक, त्याचे योग्य प्रमाण आणि पिकांसाठी होणारे फायदे याविषयी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः या प्रक्रियेत सहभागी होत जीवामृत निर्मितीची सविस्तर माहिती घेतली व नैसर्गिक शेतीची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले.

शेतीची कामे आटोपल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी गाव परिसरातील पद्धतीने, शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावर बसूनच झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या जेवणादरम्यान रंगलेल्या अनौपचारिक गप्पांमधून त्यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या.
 
⚫ यावेळी चर्चेतील प्रमुख मुद्दे - शासकीय योजनांची तळागाळातील अंमलबजावणी, आधुनिक व पारंपरिक शेती अवजारांची उपलब्धता, दर्जेदार बियाणे आणि खतांचा वेळेत पुरवठा, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील आव्हाने यावर चर्चा झाली. 

⚫ प्रशासन ३०० गावांमध्ये शेतकऱ्यांच्या दारी

पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम उत्पादन वाढीसाठी आणि शेतकरी-प्रशासन यांमधील दरी मिटवण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते.
या मोहिमेत आजरा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी हरीश सुळ, तहसीलदार समीर माने, सरपंच चंद्रकांत गुरव यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, महिला शेतकरी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

⚫ काजू कलमे, बी-बियाणे आदी साहित्य वाटप 
या उपक्रमात मागेल त्याला काजू कलमे अंतर्गत १ लाख काजू कलमे वाटप व लागवाड केली जाणार आहे. याअंतर्गत काजू कलमांचे वाटप व बि- बियाणे वाटप प्रातिनिधिक पद्धतीने करण्यात आले. तसेच आज ठिकठिकाणी सेंद्रिय निविष्टा उत्पादन बाबत मार्गदर्शन, EL-Nino बाबत करावयाच्या उपाय योजना बाबत मार्गदर्शन, कृषी पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचे तंत्रज्ञान संवाद, पीएमएफएमइ योजने अंतर्गत वैयक्तिक व गटास देण्यात येणाऱ्या प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी माहिती तसेच विविध शेतीसाठी लागणारी अवजारे मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

🟣 "शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेतल्यास योजनांची आखणी अधिक चांगल्या प्रकारे करता येते. याच उद्देशाने आम्ही गेल्या वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. केवळ कागदावर योजना न राहता प्रशासन थेट बांधावर पोहोचल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळतो."
▪️ प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes