कोल्हापूर : इराणी खण येथे 60,352 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
schedule20 Sep 26 person by visibility 239 categoryमहानगरपालिका
पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती विसर्जनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पर्यायी व्यवस्थेस शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात एकूण 60,352 घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले.
पंचगंगा नदी तसेच शहरातील तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी 160 पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तालमी व विविध संस्थांनीही कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती.
महापालिकेची विसर्जनासाठीची यंत्रणा सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत कार्यरत होती. यामध्ये अधिकारी, कर्मचारी, पवडी, आरोग्य व वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांसह 2,500 हून अधिक कर्मचारी, गणेशमूर्ती संकलनासाठी 205 टेम्पो, ट्रॉली, 460 हमाल, 7 जेसीबी, 7 डंपर, 8 ट्रॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बूम, 5 ॲम्ब्युलन्स, 2 क्रेन, 10 तराफे तसेच सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
पवडी विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणांहून नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती टेम्पो व ट्रॉलीद्वारे संकलित करून इराणी खण येथे विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनस्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात करण्यात आले होते. विद्युत विभागामार्फत विसर्जनस्थळी विद्युत व्यवस्था करण्यात आली होती.
कृत्रिम विसर्जन कुंडांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गांधी मैदान विभागीय कार्यालयांतर्गत 10,655, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत 7,686, राजारामपुरी विभागीय कार्यालयांतर्गत 8,021, ताराराणी विभागीय कार्यालयांतर्गत 7,792 आणि थेट इराणी खण येथे 14,092, अशा एकूण 48,246 गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये विसर्जन करण्यात आले.
याशिवाय काही नागरिकांनी घरच्या घरी बादलीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. इराणी खण येथे विभागीय कार्यालये तसेच नागरिकांकडून अर्पण करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे महापालिकेने बसविलेल्या स्वयंचलित विसर्जन यंत्राद्वारे खणीत विसर्जन करण्यात आले.
◼️स्वयंचलित यंत्राद्वारे 12,106 घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन
इराणी खण येथील स्वयंचलित गणेशमूर्ती विसर्जन यंत्राद्वारे 12,106 घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने घरगुती गणेशमूर्तींचे इराणी खण येथे सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी हे स्वयंचलित यंत्र सन 2022-23 मध्ये बसविण्यात आले होते.
महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी रात्री इराणी खण येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.
◼️135 मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन
विसर्जनादरम्यान नागरिकांनी अर्पण केलेले निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २३ आरोग्य निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी चार कर्मचारी दोन शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आले होते. तसेच शहरातील १४ प्रमुख विसर्जनस्थळी प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती. संकलित निर्माल्या विलगीकरण करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करण्यासाठी अवनी, एकटी, वसुंधरा तसेच इतर सेवाभावी संस्थांच्या सुमारे १५० महिला सदस्यांनी सहभाग घेतला. तसेच आरोग्य विभागाचे 950 कर्मचारीही कार्यरत होते.
नागरिकांकडून संकलित करण्यात आलेले सुमारे 135 मेट्रिक टन निर्माल्य 9 डंपर व 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने पहाटेपर्यंत संकलित करण्यात आले. हे निर्माल्य सेंद्रिय खत निर्मितीसाठी पुईखडी, बापट कॅम्प, कसबा बावडा, दुधाळी व आयसोलेशन हॉस्पिटल येथील प्रक्रिया केंद्रांकडे पाठविण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत शहरातील 160 कृत्रिम विसर्जन कुंडांच्या ठिकाणांसह पंचगंगा नदीकाठावरील गायकवाड पुतळा परिसर, रंकाळा व इराणी खण परिसरात पहाटेपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी नागरिकांना गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच गर्दी टाळून महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला मोठे सहकार्य मिळाले.
या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेचे नियोजन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, उपशहर अभियंता मिलिंद जाधव, सुरेश पाटील, निवास पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, विद्युत अभियंता अमित दळवी, नारायण पुजारी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, चेतन शिंदे, सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत तसेच महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.