मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधव
schedule10 Oct 26 person by visibility 239 categoryराजकीय
◼️पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केला.
भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेला गती देण्यासाठी मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विजय जाधव म्हणाले, की पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. आता नोंदणी केलेल्या मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्याशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी असून, मतदार यादीचे अचूक नियोजन, मतदारांशी वैयक्तिक संपर्क आणि मतदान प्रक्रियेची माहिती कार्यकर्त्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेऊन मतदार याद्यांचे विकेंद्रीकरण करावे, मतदारांची विभागणी करून संपर्काची जबाबदारी निश्चित करावी आणि सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा.
निवडणुकीच्या मतदानापर्यंत पुढील पंधरा दिवस सर्वांनी पूर्णवेळ ‘इलेक्शन मोड’मध्ये राहून काम करावे. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि मतदान प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करणे, हे कार्यकर्त्यांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास भाजपचे दोन्ही उमेदवार निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा मा.प्रदेश सचिव महेश जाधव यांनी गतकाळातील विविध निवडणुकांचा अनुभव सांगितला. पदवीधर व शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचे असून, या निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी शिक्षक मतदारसंघात पक्षाला बाहेरील उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागत होता; मात्र आता कौस्तुभ गावडे यांच्या रूपाने पक्षाचा स्वतःचा, हक्काचा शिक्षक उमेदवार मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत मंडलनिहाय मतदार यादीचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण, मतदारांशी संपर्क आणि मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन या विषयांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मतदानापर्यंत सक्रिय राहून निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, मा प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा जयंत पाटील, विराज चखलीकर, अमर साठे, मुरलीधर जाधव, आप्पा लाड, माधुरी नकाते, विश्वजीत पवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.